
परभणी, 16 जुलै, (हिं.स.)। महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत राज्यभर मध केंद्र योजना राबविण्यात येत असून, पात्र व्यक्ती व संस्थांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
या योजनेअंतर्गत मधमाशी पालन व्यवसायासाठी आवश्यक प्रशिक्षण, साहित्य स्वरूपात ५० टक्के अनुदान, उर्वरित ५० टक्के स्वगुंतवणूक, शासनाच्या हमीभावाने मध खरेदी, विशेष प्रशिक्षण सुविधा तसेच मधमाशांचे संरक्षण व संवर्धनाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.
योजनेसाठी वैयक्तिक मधपाल, प्रगतिशील मधपाल केंद्रचालक तसेच नोंदणीकृत संस्था पात्र आहेत. वैयक्तिक मधपालासाठी अर्जदार साक्षर असणे, वय १८ वर्षांपेक्षा जास्त असणे आणि १० दिवसांचे प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. केंद्रचालकासाठी किमान १० वी उत्तीर्ण, वय २१ वर्षांपेक्षा जास्त, किमान १ एकर शेती तसेच मधमाशी पालन व प्रशिक्षण देण्याची क्षमता आवश्यक आहे. संस्थांसाठी नोंदणीकृत संस्था, किमान १,००० चौ. फूट इमारत, १ एकर शेती आणि आवश्यक प्रशिक्षण सुविधा असणे आवश्यक आहे.
लाभार्थी निवडीनंतर प्रशिक्षणापूर्वी मधमाशी पालन व्यवसाय सुरू करण्याबाबत मंडळास बंधपत्र देणे तसेच मंडळाने निश्चित केलेल्या ठिकाणी प्रशिक्षण घेणे बंधनकारक राहील.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis