
मुंबई, 16 जुलै, (हिं.स.)। समस्त महाराष्ट्र आणि वारकऱ्यांचे आराध्य दैवत असलेल्या पंढरीच्या विठूरायाबद्दल अनुद्गार काढताना जनाब संजय राऊत यांना लाज वाटायला हवी होती. संजय राऊत, तुम्ही औरंगजेबाचा पक्षप्रवेश करून घेतला. अफझलखानाच्या कबरीचे सुशोभीकरण करत त्यांच्या दाढ्या कुरवाळता. तुम्हाला विठ्ठल मंदिराचे पावित्र्य माहित आहे का? विठ्ठल मंदिर लुटण्याचे काम अफजलखान, औरंगजेबाने केले होते त्या पद्धतीने तुम्हीही विठूमाऊलीचा अपमान केला आहे. त्याबद्दल तुम्ही समस्त वारकरी वर्गाची माफी मागायला हवी. विठू माऊलीचा अपमान केल्याबद्दल महाराष्ट्र तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा घणाघात भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी गुरुवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपा प्रदेश प्रवक्ते रामभाऊ कुलकर्णी उपस्थित होते.
संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना रामरक्षा आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केल्याचा उल्लेख करून श्री. बन म्हणाले, आधी जय श्रीराम म्हणणे हरामखोरपणा असे म्हटल्याबद्दल आणि प्रभू रामचंद्रांचे अस्तित्व नाकारणाऱ्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून राजकारण केल्याबद्दल उद्धवजी ठाकरे आणि संजय राऊत नाक घासून माफी मागणार असतील तर देवाभाऊही रामरक्षा आंदोलनात सहभागी होतील. मुळात रामरक्षा आंदोलन हे प्रभू रामचंद्रांबद्दल नाही तर पक्षरक्षा आंदोलन आहे. संजय राऊत तुमच्या माहितीसाठी सांगतो, बाबरीचा ढाचा पडला तेव्हा देवेंद्रजी फडणवीस अयोध्येत उपस्थित होते. राममंदिर आंदोलनात देवेंद्रजी फडणवीस यांना 18 दिवसांचा तुरुंगवास झाला होता. त्यावेळी उद्धवजी ठाकरे आणि संजय राऊत कुठे होते? त्यामुळे खऱ्या अर्थाने संजय राऊत आणि उद्धव ठाकरे ढोंगी आहेत.
इंडिया आघाडीचे अस्तित्व तरी उरले आहे का, असा सवाल करीत श्री. बन यांनी पुढे म्हणाले, ठिकऱ्या उडालेल्या इंडिया आघाडीत आता काँग्रेस आणि उबाठा असे दोनच पक्ष शिल्लक राहतील आणि काही दिवसांनी उबाठा गटही काँग्रेसमध्ये विसर्जित करून संजय राऊत काँग्रेसचे अधिकृत प्रवक्ते होतील. महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयकांना बहुतांश पक्ष पाठिंबा देताहेत. सुप्रियाताईंनीही 50 टक्के जागा वाढत असतील तर आमचा या विधेयकाला विरोध नाही आणि त्याबाबत योग्यवेळी निर्णय घेऊ, असे स्पष्ट केले आहे. याचा अर्थ सुप्रियाताई आणि इतर पक्ष महिला आरक्षण विधेयकाच्या बाजूने आहेत. फक्त संजय राऊत आणि त्यांच्या दोन खासदारांनी विरोध केला काय आणि नाही केला काय. त्याने काहीही फरक पडणार नाही. महिला आरक्षण विधेयक 100 टक्के मंजूर होईल यात कोणतीही शंका नाही, असे बन यांनी सुनावले.
संजय राऊत आणि आणि उद्धव ठाकरेंनी कायदा सुव्यवस्थेची भाषा करू नये. कायदा काय असतो हे गृहमंत्री अमितभाईंना माहिती आहे. 370 कलम रद्द करून कायदा कसा चालवतात, तिहेरी तलाक रद्द करून कायद्याची अंमलबजावणी कशी केली जाते आणि बांगलादेशच्या जमिनीवर कुंपण घालून कायद्याचे राज्य कसे आणायचे, काश्मीरमध्ये दगडफेक रोखून कायदा सुव्यवस्था कशी राखायची हे अमितभाईंनी देशाला दाखवून दिले आहे. सच्चे देशभक्त असलेले अमितभाई कायदेशीर मार्गाने चालतात. बेकायदेशीर वागत मंत्र्यांना आणि पत्रकारांना अटक करणे, लोकांची घरे पाडणे, 100 कोटी वसुली करण्याचा धंदा करणाऱ्या संजय राऊत आणि उद्धवजी यांनी इतरांना शहाणपण शिकू नये, अशा शब्दात बन यांनी फटकारले.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर