वर्धा जिल्ह्यातून पंढरपूरसाठी ११५ विशेष एसटी बसेस धावणार
वर्धा, 17 जुलै (हिं.स.)। आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी जिल्ह्यातून मोठ्या संख्येने भाविक जात असतात. ही बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) वर्धा विभागाने यंदाही पाच आगारा
पंढरपूरसाठी ११५ विशेष एसटी बसेस जिल्ह्यातून धावणार


वर्धा, 17 जुलै (हिं.स.)। आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी जिल्ह्यातून मोठ्या संख्येने भाविक जात असतात. ही बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) वर्धा विभागाने यंदाही पाच आगारांतून पंढरपूरसाठी ११५ विशेष बस चालविण्याचे नियोजन केले आहे. यासाठी आवश्यक तयारी पूर्ण करण्यात आली आहे.

यावर्षी २५ जुलै रोजी आषाढी एकादशी असल्याने २० ते २९ जुलैदरम्यान भाविकांना या विशेष बससेवेचा लाभघेता येणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी सर्व बसस्थानकांवर आगाऊ आरक्षणाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आलीआहे. आषाढी एकादशी यात्रेदरम्यान राज्यभरातून लाखो वारकरी आणि भाविक पंढरपूरला दर्शनासाठी जातात. अनेक ठिकाणांहून पायी दिंड्या रवाना होतात. भाविकांना सुरक्षित, सुलभ आणि आरामदायी प्रवास उपलब्ध करून देण्यासाठी एसटी महामंडळाकडून दरवर्षी विशेष बससेवा चालविली जाते. त्याच परंपरेनुसार यंदाही वर्धा ३७, आर्वी २६, हिंगणघाट ३३, तळेगाव ९, पुलगाव १० अशा एकूण ११५ विशेष बसफेऱ्यांचे नियोजन केले आहे.

गावातूनही मिळणार विशेष बस सुविधा

ग्रामीण भागातील भाविक, वारकरी मंडळे, भजन मंडळे, तसेच मंदिर समित्यांना सामूहिक प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी समूह आरक्षणाची व्यवस्था करण्यात आली आहे. एखाद्या गावातून ४० किंवा त्यापेक्षा अधिक भाविकांनी एकत्रितपणे पंढरपूरला जाण्याची नोंदणी केल्यास आगाऊ समूह आरक्षणाच्याआधारे त्या गावातूनच विशेष एसटी बसची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

योजनांचा लाभ मिळणार पंढरपूरसाठी धावणाऱ्या विशेष बसमध्ये ७५ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना 'अमृत ज्येष्ठ नागरिक योजना' अंतर्गत सवलतीचा लाभ मिळणार आहे. तसेच महिलांना 'महिला सन्मान योजना' अंतर्गत तिकीटदरात ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे.

गतवर्षी २९ हजारांहून अधिक भाविकांनी केला प्रवास

गतवर्षी पंढरपूर यात्रेसाठी जिल्ह्यातून १२३ विशेष एसटी बसने २७२ फेऱ्या पूर्ण केल्या होत्या. या बसमधून २९ हजार २५८ भाविकांनी प्रवास केला. यात बसांनी एकूण १ लाख ८३ हजार ६५८ किलोमीटर अंतर पार केले असून, एसटी महामंडळाला १ कोटी १४ लाख ४९ हजार ४०९ रुपयांचे उत्पन्न मिळाले होते, अशी माहिती वधां विभागाने दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande