
बीड, 17 जुलै (हिं.स.)।
अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या पळसखेडा येथील ७६ वर्षीय आजींचा पैशांचा आणि महत्त्वाच्या कागदपत्रांचा बटवा आज सकाळी गर्दीत हरवला. सैरभैर होऊन रडणाऱ्या या आजींना अंबाजोगाईचे माजी नगराध्यक्ष महादू मस्के यांनी मदतीचा हात देत, सीसीटीव्हीच्या माध्यमातून बटवा शोधून परत केला आणि माणुसकीचे एक उत्तम उदाहरण समाजासमोर ठेवले.
आशिया खंडातील सर्वात मोठे ग्रामीण रुग्णालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्व. रा. ती. रुग्णालयात दररोज हजारो रुग्णांची ये-जा असते. याच गर्दीत आज सकाळी पळसखेडा येथील मुक्ताबाई परसराम जाधव (वय ७६) या आजीबाई वैद्यकीय तपासणीसाठी आल्या होत्या. मात्र, उपचारासाठी रांगेत उभे असताना अचानक त्यांच्या हातातील बटवा गहाळ झाला. या बटव्यात त्यांचे पैसे आणि आधार कार्ड यांसारखी महत्त्वाची कागदपत्रे होती. यामुळे आजीबाई हवालदील झाल्या आणि त्यांना रुग्णालयाच्या आवारातच रडू कोसळले. आजूबाजूला बघ्यांची मोठी गर्दी जमली, मात्र प्रत्यक्ष मदतीला कोणीही पुढे आले नाही.
याच वेळी रुग्णालयात रुग्णांच्या मदतीसाठी नेहमी तत्पर असणारे माजी नगराध्यक्ष महादू मस्के तिथे पोहोचले. त्यांनी आजीबाईंना धीर देत बटवा शोधून देण्याचे आश्वासन दिले. आजीबाईंना सुरक्षितपणे त्यांच्या गावी पळसखेडा येथे पाठवल्यानंतर मस्के यांनी रुग्णालयातील सुरक्षारक्षकांच्या मदतीने शोधमोहीम सुरू केली. आजीबाई रुग्णालयात ज्या-ज्या ठिकाणी गेल्या होत्या, तिथले सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. या तत्पर प्रयत्नांना यश आले आणि फुटेजच्या आधारे आजीबाईंचा बटवा सापडला.
बटवा सापडल्यानंतर महादू मस्के यांनी त्यातील रोख रक्कम आणि कागदपत्रांची खात्री केली व आजीबाईंना निरोप देऊन सर्व ऐवज सुरक्षितपणे त्यांच्या स्वाधीन केला. ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांच्या मार्गदर्शनाखाली महादू मस्के हे सातत्याने स्वा. रा. ती. रुग्णालयात रुग्णांची सेवा करत असतात. त्यांच्या या संवेदनशील आणि तत्पर मदतीमुळे आजीबाईंच्या चेहऱ्यावर हसू परतले असून, परिसरातून मस्के यांच्या या सामाजिक बांधिलकीचे मोठे कौतुक होत आहे
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis