
राष्ट्रीय खाद्यतेल अभियानांतर्गत ‘मिनी ऑइल मिल/एक्सपेलर’ घटकाला प्रोत्साहन
छत्रपती संभाजीनगर, 17 जुलै (हिं.स.) : राज्यातील तेलबिया उत्पादनाला चालना देऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याच्या उद्देशाने कृषी विभागामार्फत राष्ट्रीय खाद्यतेल अभियान - तेलबिया (NMEO-OS) 2026-27 ची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.
या अभियानांतर्गत शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्या (FPO/FPC) तसेच मूल्य साखळी भागीदार गट (VCP) यांना प्रक्रिया उद्योगात आत्मनिर्भर बनविण्यासाठी ‘मिनी ऑइल मिल/एक्सपेलर’ या घटकावर आकर्षक अनुदान उपलब्ध करून देण्यात आले आहे.
या योजनेंतर्गत मिनी ऑइल मिल/एक्सपेलर खरेदीसाठी शासनाकडून दोन प्रकारे आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. फिल्टर प्रेससह मिनी ऑइल मिल/एक्सपेलर या घटकासाठी प्रति युनिट 4 लाख रुपये इतकी उच्चतम अनुदान मर्यादा निश्चित करण्यात आली असून, जिल्ह्यासाठी 11 युनिटचा भौतिक लक्षांक मंजूर करण्यात आला आहे.
या घटकासाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी तसेच महिला प्रवर्गातील लाभार्थ्यांना युनिटच्या एकूण किमतीच्या 50 टक्के किंवा निर्धारित उच्चतम मर्यादेपर्यंत अनुदान देण्यात येणार आहे. तर सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना युनिटच्या किमतीच्या 40 टक्के किंवा निर्धारित मर्यादेपर्यंत अनुदान मिळणार आहे.
तसेच फिल्टर प्रेसशिवाय मिनी ऑइल मिल/एक्सपेलर या घटकासाठी प्रति युनिट 3 लाख रुपये इतकी उच्चतम अनुदान मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. या घटकासाठीही जिल्ह्यास 11 युनिटचा लक्षांक प्राप्त झाला आहे. या योजनेत पात्र लाभार्थ्यांना प्रवर्गानुसार 50 टक्के किंवा 40 टक्क्यांपर्यंत अनुदान उपलब्ध होणार आहे.
या योजनेचा लाभ वैयक्तिक शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्या (FPO/FPC) आणि मूल्य साखळी भागीदार गट (VCP) घेऊ शकतात. लाभार्थी निवडीत शेतकरी उत्पादक कंपन्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार असून, लक्षांक शिल्लक राहिल्यास वैयक्तिक लाभार्थ्यांचा विचार केला जाईल. तसेच आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षानिमित्त महिला शेतकऱ्यांनाही विशेष प्राधान्य देण्यात येणार आहे.
ही योजना कृषी यांत्रिकीकरण उपअभियानाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राबविण्यात येणार आहे. योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या पात्र लाभार्थ्यांनी 25 जुलै 2027 पर्यंत महाडीबीटी (MahaDBT) पोर्टलवर ऑनलाइन अर्ज सादर करावेत. प्राप्त अर्जांमधून राष्ट्रीय खाद्यतेल अभियानांतर्गत प्राधान्याने लाभार्थी निवड केली जाणार आहे.
जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकरी उत्पादक कंपन्या, महिला शेतकरी आणि इतर पात्र घटकांनी या योजनेचा लाभ घेऊन तेलबिया प्रक्रिया उद्योगात पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, धाराशिव यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी किंवा उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
-----------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis