
अमरावती, १७ जुलै (हिं.स.) : ग्रामीण भागातील महिलांना आत्मनिर्भर बनविण्यासह शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्याच्या उद्देशाने कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्था आणि म्यूनिक री यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या ‘ड्रोन दीदी’ प्रकल्पामुळे महिलांना मोठा आधार मिळत आहे. या उपक्रमांतर्गत शिरजगाव कसबा येथे ड्रोन फवारणीचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.
अमरावती जिल्ह्यातील पहिल्या महिला ड्रोन पायलट कल्पना विनोद वानखडे या समर्थ महिला स्वयंसहायता समूहाच्या सदस्य आहेत. ड्रोन व्यवसाय सुरू केल्यानंतर अतिरिक्त बॅटरी संच, ड्रोन वाहतुकीसाठी वाहन, को-पायलटची सुविधा, स्थानिक स्तरावरील स्पेअर पार्ट्स व सर्व्हिस सेंटरचा अभाव तसेच देखभाल-दुरुस्तीबाबत मर्यादित तांत्रिक ज्ञान अशा विविध अडचणींमुळे त्यांचा व्यवसाय अडथळ्यात आला होता.
या पार्श्वभूमीवर कृषी विकास संस्थेने अशा अडचणीत असलेल्या ‘ड्रोन दीदी’ंची ओळख पटवून त्यांच्यासाठी तीन दिवसांचे निवासी ड्रोन देखभाल व दुरुस्ती प्रशिक्षण आयोजित केले. या प्रशिक्षणात ड्रोन पायलट महिलांसह त्यांच्या को-पायलटलाही प्रशिक्षण देण्यात आले. याशिवाय आवश्यक स्पेअर पार्ट्स, ॲक्सेसरीज, अतिरिक्त तीन बॅटरी संच आणि ड्रोन वाहतुकीसाठी वाहन उपलब्ध करून देण्यात आले.
या सहाय्यामुळे कल्पना वानखडे आणि त्यांच्या स्वयंसहायता समूहाच्या व्यवसायाला नवी चालना मिळाली असून त्यांच्या उत्पन्नात आणि कामकाजात लक्षणीय वाढ झाली आहे.
शिरजगाव कसबा येथे आयोजित ड्रोन फवारणी प्रात्यक्षिकाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी यांनी उपस्थित राहून पाहणी केली. त्यांनी ड्रोन पायलट कल्पना वानखडे यांच्याशी संवाद साधत उपक्रमाची माहिती घेतली.
बालमुकुंद राठी विद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या या प्रात्यक्षिकामध्ये शेतकऱ्यांना ड्रोनद्वारे फवारणीचे फायदे, कार्यपद्धती आणि आधुनिक शेतीतील महत्त्व याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थित शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानाबद्दल उत्सुकता व्यक्त करत त्याचा अवलंब करण्याची तयारी दर्शवली.
यावेळी चांदूरबाजारचे गटविकास अधिकारी डॉ. नीलेश वानखडे, कृषी विकास कार्यक्रम अधिकारी लक्ष्मीकांत पडघन, विस्तार अधिकारी किशोर रामगडे, शिरजगाव कसबा ग्रामपंचायतीचे प्रशासक प्रवीण खेरडे, सागर वासनकर, सुभाष तांबे, शिल्पा राठोड, ग्रामविकास अधिकारी सुरेश रेखाते तसेच ग्रामसखी आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
----------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी