सोलापूर : १८ गावांच्या विकासासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन एकाच व्यासपीठावर
सोलापूर, 17 जुलै (हिं.स.)।ग्रामीण भागातील विकासकामांना गती देणे, शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करणे आणि गावपातळीवरील समस्या तातडीने मार्गी लावण्याच्या उद्देशाने अक्कलकोट तालुक्यात एक अभिनव उपक्रम राबविण्यात आला. जिल्हा परिषद सदस्या श
सोलापूर : १८ गावांच्या विकासासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन एकाच व्यासपीठावर


सोलापूर, 17 जुलै (हिं.स.)।ग्रामीण भागातील विकासकामांना गती देणे, शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करणे आणि गावपातळीवरील समस्या तातडीने मार्गी लावण्याच्या उद्देशाने अक्कलकोट तालुक्यात एक अभिनव उपक्रम राबविण्यात आला. जिल्हा परिषद सदस्या शांभवी कल्याणशेट्टी, पंचायत समिती सभापती रश्मी हिप्परगी आणि उपसभापती सागर कल्याणशेट्टी यांच्या पुढाकारातून चपळगाव गटातील १८ गावांसाठी हन्नूर येथे लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकाऱ्यांची संयुक्त ‘सहविचार सभा’ उत्साहात पार पडली.

गावांचा सर्वांगीण विकास, स्थानिक गरजांचा प्रत्यक्ष आढावा आणि प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्यात प्रभावी समन्वय निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित या बैठकीला विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, सरपंच, उपसरपंच, प्रशासक, शिक्षक, आरोग्य कर्मचारी, आशा सेविका आणि ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कार्यक्रमाची सुरुवात जगद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर जिल्हा परिषद सदस्या शांभवी कल्याणशेट्टी यांनी प्रास्ताविकातून या उपक्रमामागील उद्दिष्टे, ग्रामीण विकासाची दिशा आणि प्रशासन-लोकप्रतिनिधी समन्वयाचे महत्त्व अधोरेखित केले.

या बैठकीला पंचायत समिती सदस्य विनोद मोरे, गटविकास अधिकारी शंकर कवितके, सहाय्यक गटविकास अधिकारी अमोल मुंडे, उपअभियंता एम. एस. उंबरजे, बालविकास प्रकल्प अधिकारी भोसले, यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

सभेत चपळगाव, हन्नूर, बऱ्हाणपूर, बावकरवाडी, चपळगाववाडी, डोंबरजवळगे, कुरनूर, सिंदखेड, मोट्याळ, किणी, काझीकणबस, किणीवाडी, सुलतानपूर, बोरेगाव, दर्शनाळ, पितापूर, नन्हेगाव, अरळी आणि चुंगी या गावांतील पाणीपुरवठा, आरोग्य सुविधा, शिक्षण, रस्ते, स्वच्छता आणि इतर मूलभूत सुविधांशी संबंधित प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande