वर्धा : बालिकेची हत्या करणाऱ्या आरोपीला अटक
वर्धा, 17 जुलै (हिं.स.) : शहरालगतच्या रोठा तलाव परिसरातील शेतात १२ वर्षीय बालिकेची दगडाने ठेचून निघृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत कुटुंबाच्या परिचयातील
Accused arrested for the murder of a young girl at Rotha.


वर्धा, 17 जुलै (हिं.स.) : शहरालगतच्या रोठा तलाव परिसरातील शेतात १२ वर्षीय बालिकेची दगडाने ठेचून निघृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत कुटुंबाच्या परिचयातील तरुणाला अटक केली आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव राहुल राजू मडावी (३०), रा. रोठा असे आहे. घटनेनंतर काही तासांतच पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील महाडिक आणि त्यांची टीम करीत आहे.

वर्धा येथील कावळे यांच्या मालकीच्या रोठा तलाव परिसरातील शेतातील झोपडीत पीडित बालिकेचे कुटुंब राहत होते. मृत बालिका आणि तिच्या दोन बहिणी गावातील शाळेत शिक्षण घेत होत्या. बुधवारी नेहमीप्रमाणे त्या शाळेत गेल्या होत्या, तर आई-वडील काही कामानिमित्त वर्धा येथे गेले होते.

याचदरम्यान बालिका दुपारी शाळेतून लवकर घरी परतली असता घरात एकटी होती. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, आरोपीने याच संधीचा फायदा घेत घरात प्रवेश केला. घटनेची माहिती कुणाला मिळू नये या उद्देशाने त्याने बालिकेची दगडाने ठेचून हत्या केली आणि घटनास्थळावरून पळ काढला.

कुटुंबीय घरी परतल्यानंतर त्यांना मुलीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. तिच्या डोक्यावर गंभीर दुखापती असल्याचे निदर्शनास आले. याबाबत तातडीने सावंगी पोलिसांना माहिती देण्यात आली.

माहिती मिळताच सावंगी पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्यासह सायबर क्राइम विभाग, श्वान पथक, ठसेतज्ज्ञ आणि फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी भेट देऊन पुरावे संकलित केले. मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा करण्यात आला व उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला.

आरोपीच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग, सावंगी पोलीस ठाणे, रामनगर आणि वर्धा शहर पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची १४ पथके तयार करण्यात आली होती. तसेच सायबर क्राइम विभागाचे पथकही तपासासाठी सक्रिय करण्यात आले होते.

आरोपी राहुल मडावी हा रोठा गावातील रहिवासी असून, पीडित कुटुंब राहत असलेल्या शेतालगतच्या शेतात मजुरीचे काम करीत होता. पाणी पिण्यासाठी तसेच भेटण्यासाठी तो नियमितपणे पीडित कुटुंबाकडे येत असल्याचे तपासात समोर आले आहे.

याच परिचयाचा फायदा घेत आरोपीने ही घटना केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणात सखोल तपास सुरू असून, पुढील चौकशीत आणखी माहिती समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande