कोल्हापूर : शिरोलीतील माजी उपसरपंचासह कोळी-मोहिते टोळीतील सहा जणांवर हद्दपारीची कारवाई
कोल्हापूर, 17 जुलै (हिं.स.)। शिरोली पुलाची येथील कोळी आणि मोहिते यांच्या गुन्हेगारी टोळीतील म्होरक्यासह सहा जणांना जिल्हा पोलिस अधीक्षक निलोत्पल यांनी महाराष्ट्र पोलिस अधिनियम, १९५१ च्या कलम ५५ अंतर्गत वर्षासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपारीची का
शिरोलीतील हद्दपार कारवाईतील आरोपी


कोल्हापूर, 17 जुलै (हिं.स.)। शिरोली पुलाची येथील कोळी आणि मोहिते यांच्या गुन्हेगारी टोळीतील म्होरक्यासह सहा जणांना जिल्हा पोलिस अधीक्षक निलोत्पल यांनी महाराष्ट्र पोलिस अधिनियम, १९५१ च्या कलम ५५ अंतर्गत वर्षासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपारीची कारवाई केली. यातील शिरोलीचा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आणि माजी उपसरपंच अविनाश अनिल कोळी (वय ३९) याच्यासह

तिघांना शिरोली एमआयडीसी पोलिसांनी तातडीने नोटीस बाजावून जिल्ह्याबाहेर जाण्याच्या सूचना केल्या तर उर्वरित तिघांपैकी दोघे सध्या तुरुंगात असून एकजण फरारी आहे.

शिरोली पोलिस ठाण्याच्या हद्दीत वारंवार होणाऱ्या गुंडगिरी, खून, खुनाचा प्रयत्न, मारामाऱ्या, मादक पदार्थांची विक्री, दहशत असे गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांवर वचक राहावा आणि परिसरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी ही कारवाई केली आहे.

हद्दपार केलेल्यामध्ये अविनाश अनिल कोळी, श्रीकांत मोहिते (३४, अण्णाभाऊ साठे चौक), कार्तिक परशुराम राजुगरीकर (३१, विलासनगर), अनिकेत आनंदा कांबळे, ऋषिकेश ऊर्फ प्रताप शिवाजी भोरे आणि अली ऊर्फ जमीर बालेचाँद तानेखान (रा. शिरोली) यांचा समावेश आहे.

शिरोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित टोळीतील सदस्यांविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. या पार्श्वभूमीवर शिरोली पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे हद्दपारीचा प्रस्ताव सादर केला होता. प्रस्तावाची छाननी करून जिल्हा पोलिस अधीक्षक निलोत्पल यांनी संबंधित टोळीवर एक वर्षासाठी हद्दपारीचे आदेश जारी केले.

या आदेशानुसार अविनाश कोळी, श्रीकांत मोहिते आणि कार्तिक राजुगरीकर यांना बुधवारी रात्री सुमारे दहा वाजता नोटिसा बजावून कोल्हापूर जिल्ह्याच्या हद्दीतून बाहेर जाण्याचे आदेश दिले. अनिकेत आनंदा कांबळे व ऋषिकेश ऊर्फ प्रताप शिवाजी भोरे हे सध्या तुरुंगात असून, त्यांची सुटका झाल्यानंतर त्यांच्यावर हद्दपारीची कारवाई अंमलात आणली जाईल. अली ऊर्फ जमीर बालेचाँद तानेखान हा सध्या फरारी असून, तो ताब्यात आल्यानंतर त्याच्यावरही हद्दपारीची कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. शिरोली परिसरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी अशा प्रकारच्या कारवाया या पुढेही सुरू राहतील, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande