
अमरावती, १७ जुलै (हिं.स.) : अमरावती जिल्ह्यातील नगरपरिषदांच्या आस्थापनेवरील ३२ कर्मचाऱ्यांना अखेर पदोन्नतीचा लाभ मिळाला आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली पदोन्नती प्रक्रिया जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या पुढाकाराने मार्गी लागल्याने संबंधित कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नगरपालिका व नगरपंचायतींच्या जिल्हास्तरीय पदोन्नती समितीची नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीत सर्व मुख्याधिकाऱ्यांनी आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थांतील पात्र कर्मचाऱ्यांचे प्रस्ताव सादर केले. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पात्र कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीस मंजुरी देण्यात आली.
या प्रक्रियेनुसार लिपिक व टंकलेखकांना वरिष्ठ लिपिक पदावर, तर शिपाई व सफाई कर्मचाऱ्यांना कनिष्ठ लिपिक पदावर पदोन्नती देण्यात आली. नगरपालिका प्रशासनाचे सहआयुक्त तथा नगरपालिका प्रशासक डॉ. विकास खंडारे यांच्या संकल्पनेतून हा विषय पुढे आला असून, जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी त्याला पाठिंबा दिल्याने प्रक्रिया पूर्णत्वास गेली.
पदोन्नतीनंतर काही कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी, सहायक आयुक्त तसेच संबंधित नगरपालिकांच्या मुख्याधिकाऱ्यांनी पदोन्नत कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. वाढलेल्या मनुष्यबळाच्या बळावर नगरपालिका प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम आणि गतिमान होईल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.
या पदोन्नती प्रक्रियेत जिल्ह्यातील नऊ नगरपरिषदांतील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. अचलपूर नगरपरिषदेतील १२, वरुड येथील ५, अंजनगाव सुर्जी व दर्यापूर येथील प्रत्येकी ३, मोर्शी व चांदूरबाजार येथील प्रत्येकी २, तर शेंदुरजनाघाट व धामणगाव रेल्वे येथील प्रत्येकी एका कर्मचाऱ्याला पदोन्नती मिळाली आहे.
-------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी