सरकारी शाळा शिक्षणासाठी की कंपनीच्या प्रचारासाठी?
रायगड, 17 जुलै (हिं.स.)। कर्जत तालुक्यातील काही जिल्हा परिषद शाळा आणि ग्रामपंचायतींमध्ये टोरेंट पॉवर कंपनीकडून कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) अंतर्गत विविध कार्यक्रम आयोजित केल्याची माहिती समोर येत आहे. समाजोपयोगी उपक्रमांचे स्वागत असले, तर
Are government schools for education or for promoting a company?


रायगड, 17 जुलै (हिं.स.)। कर्जत तालुक्यातील काही जिल्हा परिषद शाळा आणि ग्रामपंचायतींमध्ये टोरेंट पॉवर कंपनीकडून कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) अंतर्गत विविध कार्यक्रम आयोजित केल्याची माहिती समोर येत आहे. समाजोपयोगी उपक्रमांचे स्वागत असले, तरी या कार्यक्रमांच्या अनुषंगाने काही गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत, असे कर्जत तालुका पर्यावरण बचाव संघर्ष समितीने म्हटले आहे.

समितीच्या म्हणण्यानुसार, टोरेंट पॉवर कंपनीचे कर्जत तालुक्यातील प्रकल्प अनेक वर्षांपासून वादग्रस्त असून हजारो शेतकरी, आदिवासी आणि ग्रामस्थ त्यास विरोध करत आहेत. अशा परिस्थितीत सरकारी शाळांमध्ये कंपनीचे कार्यक्रम आयोजित करणे योग्य आहे का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.

समितीने काही मुद्द्यांवर प्रशासनाकडून स्पष्टीकरण मागितले आहे. या कार्यक्रमांसाठी शिक्षण विभागाची लेखी परवानगी घेण्यात आली होती का? शाळा व्यवस्थापन समिती (SMC) आणि पालकांची संमती मिळविण्यात आली होती का? विद्यार्थ्यांचे फोटो किंवा व्हिडिओ कंपनीच्या प्रसिद्धीसाठी किंवा सामाजिक माध्यमांवरील प्रचारासाठी वापरले जाणार आहेत का? तसेच सरकारी शाळांचा वापर कंपनीची प्रतिमा उंचावण्यासाठी किंवा वादग्रस्त प्रकल्पाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी केला जात आहे का, याचीही चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

सरकारी शाळा या सार्वजनिक शिक्षणाच्या संस्था असून त्या कोणत्याही खाजगी कंपनीच्या प्रतिमा उभारणीचे किंवा जनसंपर्काचे व्यासपीठ बनू नयेत, असे समितीचे म्हणणे आहे. विद्यार्थ्यांचे हित, शिक्षणाची गुणवत्ता आणि शाळांची तटस्थता या बाबींना सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

यासंदर्भात शिक्षण विभाग, रायगड जिल्हा परिषद आणि जिल्हा प्रशासनाने वस्तुस्थिती स्पष्ट करून आवश्यक असल्यास चौकशी करावी, अशी मागणी कर्जत तालुका पर्यावरण बचाव संघर्ष समितीने केली आहे.. वरील मजकूर हा कर्जत तालुका पर्यावरण बचाव संघर्ष समितीने केलेल्या निवेदनावर आधारित असून त्यातील आरोप व प्रश्न हे संबंधित समितीचे आहेत. यावर संबंधित प्रशासन किंवा टोरेंट पॉवर कंपनीची अधिकृत भूमिका उपलब्ध झाल्यास तीही प्रसिद्ध केली जाईल.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande