
नांदेड, 17 जुलै (हिं.स.) महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मध केंद्र योजना (मधमाशी पालन) राबविण्यात येत असून, या योजनेसाठी पात्र व्यक्ती व संस्थांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
योजनेअंतर्गत मध उद्योगाचे मोफत प्रशिक्षण, साहित्य स्वरूपात 50 टक्के अनुदान व 50 टक्के स्वगुंतवणुकीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच शासनाच्या हमी भावाने मध खरेदी, विशेष छंद प्रशिक्षणाची सुविधा आणि मधमाशांचे संरक्षण व संवर्धनाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.
या योजनेसाठी इच्छुकांनी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, जिल्हा कार्यालय, औद्योगिक वसाहत, उद्योग भवन, एमआयडीसी एरिया, शिवाजीनगर, नांदेड येथे संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक 02462-240674 किंवा 9689200239 वर संपर्क साधावा, असे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.
योजनेतील प्रमुख घटक व पात्रता
1) वैयक्तिक मधपाळ
अर्जदार साक्षर असावा.
स्वतःची शेती असल्यास प्राधान्य देण्यात येईल.
अर्जदाराचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असावे.
10 दिवसांचे प्रशिक्षण घेणे अनिवार्य राहील.
2) केंद्रचालक प्रगतिशील मधपाळ
अर्जदार दहावी उत्तीर्ण असावा.
वय 21 वर्षांपेक्षा जास्त असावे.
अर्जदाराच्या किंवा कुटुंबातील व्यक्तीच्या नावे किमान 1 एकर शेती जमीन असावी
किंवा भाडेतत्त्वावर घेतलेली जमीन असावी.
मधमाशी पालन, प्रजनन व मध उत्पादनाबाबत इतरांना प्रशिक्षण देण्याची क्षमता व आवश्यक सुविधा असणे आवश्यक आहे.
3) केंद्रचालक संस्था
संस्था नोंदणीकृत असणे आवश्यक आहे.
संस्थेच्या मालकीची किंवा भाडेतत्त्वावर घेतलेली किमान 1000 चौ. फुट सुयोग्य इमारत असावी.
संस्थेकडे स्वतःची किंवा भाडेतत्त्वावर घेतलेली किमान 1 एकर शेती जमीन असावी.
मधमाशी पालन व मध उत्पादनाचे प्रशिक्षण देण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध असावे.
अटी व शर्ती
लाभार्थी निवड प्रक्रियेनंतर प्रशिक्षणापूर्वी मध व्यवसाय सुरू करण्यासंबंधी मंडळास बंधपत्र देणे अनिवार्य राहील. तसेच मंडळाने निश्चित केलेल्या ठिकाणी प्रशिक्षण घेणे आवश्यक राहणार असल्याचे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी नांदेड यांनी स्पष्ट केले आहे.
------------------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis