स्वच्छता व कचरा व्यवस्थापनात हलगर्जीपणा नको : आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले
अमरावती, १७ जुलै (हिं.स.) : अमरावती महानगरपालिका आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांनी गाडगेनगर परिसर, नवसारी येथील कचरा संकलन केंद्र (कचरा स्पॉट) तसेच नवसारी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सची पाहणी करून स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि सुरू असलेल्या विकासकामांचा आढा
गाडगेनगर, नवसारी कचरा स्पॉट व स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सची आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांच्याकडून पाहणी


अमरावती, १७ जुलै (हिं.स.) : अमरावती महानगरपालिका आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांनी गाडगेनगर परिसर, नवसारी येथील कचरा संकलन केंद्र (कचरा स्पॉट) तसेच नवसारी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सची पाहणी करून स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा घेतला. सर्व विभागांनी परस्पर समन्वय राखून नियोजनबद्ध पद्धतीने कामे पूर्ण करावीत, तसेच शहरातील स्वच्छता आणि सार्वजनिक सुविधांबाबत कोणताही हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही, असा इशारा त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिला.

पाहणीची सुरुवात गाडगेनगर येथील संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी पीडीएमसी प्रभागातील नगरसेवक प्रमोद महल्ले यांनी सर्व नगरसेवकांच्या वतीने आयुक्तांचे स्वागत केले. परिसरातील स्वच्छता, पायाभूत सुविधा आणि विकासकामांशी संबंधित विविध समस्या नगरसेवकांनी आयुक्तांसमोर मांडल्या. त्यावर संबंधित विभागांनी तातडीने कार्यवाही करून नागरिकांच्या समस्या सोडविण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.

परिसरातील स्वच्छता व्यवस्थेची पाहणी करताना संत गाडगेबाबा यांच्या स्वच्छतेच्या विचारांचा आदर्श ठेवून शहरातील प्रत्येक परिसर स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी ठेवणे ही महानगरपालिकेसह नागरिकांचीही सामूहिक जबाबदारी असल्याचे डॉ. गोंदावले यांनी नमूद केले.

यानंतर नवसारी येथील कचरा संकलन केंद्राची पाहणी करून त्यांनी कचरा संकलन, विल्हेवाट आणि व्यवस्थापनाच्या कामांचा आढावा घेतला. परिसरात कचरा साचणार नाही, अस्वच्छता निर्माण होणार नाही आणि नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही, यासाठी नियमित देखरेख ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. कचरा व्यवस्थापनाची संपूर्ण प्रक्रिया अधिक प्रभावी, शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध पद्धतीने राबविण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

नवसारी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये सुरू असलेल्या कामांची पाहणी करत आयुक्तांनी प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

नागरिकांना दर्जेदार क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कामाच्या गुणवत्तेशी कोणतीही तडजोड न करता निर्धारित कालमर्यादेत सर्व कामे पूर्ण करावीत, असे त्यांनी स्पष्ट केले.

विविध विभागांच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधताना विभागांमधील समन्वय अधिक मजबूत करण्यावर त्यांनी भर दिला. प्रत्येक कामाचे योग्य नियोजन, जबाबदाऱ्यांचे स्पष्ट वाटप, नियमित आढावा आणि वेळेत अंमलबजावणी यावर भर देत अमरावती शहर अधिक स्वच्छ, सुंदर आणि सुविधायुक्त करण्यासाठी सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी जबाबदारीने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.

----------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande