
बीड, 17 जुलै (हिं.स.)।
▪️ महसूल प्रशासनाच्या कामकाजात पारदर्शकता व गतिमानता आणण्याचे निर्देश
▪️ कार्यालयीन कामकाजात खाजगी व्यक्तींचा हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही
बीड जिल्ह्यातील महसूल प्रशासन अधिक जनहिताभिमुख, पारदर्शक व उत्तरदायी करण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित विशेष बैठकीत जिल्ह्यातील महसूल अधिकाऱ्यांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला.
बैठकीत गावपातळीवरील समन्वय अधिक प्रभावी करण्यासह नागरिकांना केंद्रबिंदू मानून प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी श्री. जॉन्सन यांनी दिले. कार्यालयीन कामकाजात कोणत्याही खाजगी व्यक्तीचा हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही. तसेच शासकीय कामकाजासाठी वापरण्यात येणारे युजर आयडी व डिजिटल स्वाक्षरी कोणत्याही परिस्थितीत खाजगी व्यक्तींच्या हाती देऊ नयेत. याबाबत नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.
नागरिकांकडून शासनाने निश्चित केलेल्या शुल्काव्यतिरिक्त कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही, याची काटेकोर अंमलबजावणी करावी. तसेच अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीवर प्रभावी नियंत्रण ठेवून दंडात्मक वसुलीच्या कार्यवाहीला गती द्यावी, अशा सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान, ई-फेरफार, उन्हाळी ई-पीक पाहणी, नवीन वाळू घाटांचे प्रस्ताव, एसआयआर कामकाज, नैसर्गिक आपत्तीअंतर्गत पीक नुकसान अनुदानाचे डीबीटीद्वारे वितरण तसेच प्रलंबित ई-केवायसी आदी महत्त्वपूर्ण विषयांचा आढावा घेण्यात आला.
एसआयआरचे 72.66 टक्के पूर्ण झालेले काम 100 टक्के पूर्ण करण्यासाठी बीएलओ सहाय्यकांची संख्या वाढविण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच नैसर्गिक आपत्तीअंतर्गत पीक नुकसानीचे अनुदान डीबीटीद्वारे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करणे आणि प्रलंबित ई-केवायसीची कार्यवाही तातडीने पूर्ण करण्यावर भर देण्यात आला.
नागरिकांच्या सोयीसाठी अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यालयाच्या दर्शनी भागात नागरिकांच्या भेटीचे वेळापत्रक प्रदर्शित करावे तसेच क्षेत्रीय दौऱ्यावर जाताना संबंधित गावातील नागरिकांना पूर्वकल्पना द्यावी, असे निर्देशही जिल्हाधिकारी श्री. जॉन्सन यांनी दिले.
महसूल प्रशासन अधिक पारदर्शक, जबाबदार व जनहिताभिमुख करण्यासाठी बैठकीत देण्यात आलेल्या सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी यावेळी दिले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis