अमरावतीतील ५५५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची तयारी वेगात
आगामी ४ ऑगस्टनंतर कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता अमरावती, १७ जुलै (हिं.स.) : अमरावती जिल्ह्यातील ५५५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची तयारी वेगाने सुरू झाली असून, राज्य निवडणूक आयोगाने मतदार याद्या अद्ययावत करण्याची प्रक्रिया सुरू केली आ
अमरावती जिल्ह्यात ऑगस्टमध्ये निवडणुकीची घोषणा अपेक्षित, 4 ऑगस्टला अंतिम मतदार यादी


आगामी ४ ऑगस्टनंतर कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता

अमरावती, १७ जुलै (हिं.स.) : अमरावती जिल्ह्यातील ५५५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची तयारी वेगाने सुरू झाली असून, राज्य निवडणूक आयोगाने मतदार याद्या अद्ययावत करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. अंतिम मतदार यादी ४ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणार असून, त्यानंतर कधीही निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे ग्रामीण भागात पुन्हा एकदा निवडणुकीचे वातावरण निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

राज्य निवडणूक आयोगाने या निवडणुकांसाठी १५ एप्रिल २०२६ रोजी अस्तित्वात असलेल्या विधानसभा मतदार यादीचा आधार घेण्याचे निर्देश दिले आहेत. या यादीचे भाग करून ग्रामपंचायतनिहाय प्रारूप मतदार याद्या तयार केल्या जात असून, त्या २४ जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.

प्रारूप मतदार यादीवर २९ जुलैपर्यंत हरकती आणि सूचना स्वीकारण्यात येतील. प्राप्त हरकतींची छाननी करून ४ ऑगस्ट रोजी अंतिम मतदार यादी जाहीर केली जाणार आहे. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.

अमरावती जिल्ह्यातील एकूण ५५५ ग्रामपंचायतींचा कार्यकाळ २०२४-२५ दरम्यान संपला असून, सध्या या ग्रामपंचायतींवर माजी सरपंचांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या ग्रामपंचायतींची प्रभागरचना आणि आरक्षणाची अंतिम अधिसूचना १० जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

राज्य निवडणूक आयोगाने २०२४-२५ मध्ये मुदत संपलेल्या तसेच २०२६ मध्ये नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आवश्यक तयारी सुरू केली आहे. आयोगाच्या निर्देशानुसार संगणकीय प्रणालीद्वारे मतदार याद्या अद्ययावत करण्याचे काम वेगाने सुरू असून, सुधारित कार्यक्रमाबाबत सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सविस्तर सूचना देण्यात आल्या आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande