सोलापूर : फाईल गहाळ प्रकरणात तत्कालीन नगरअभियंता सुभाष सावस्कर दोषमुक्त
सोलापूर, 17 जुलै (हिं.स.)। महापालिकेतील पाच महत्त्वाच्या फाईली जाणीवपूर्वक गहाळ करून महापालिकेचे नुकसान केल्याच्या आरोपावरून दाखल करण्यात आलेल्या खटल्यातून तत्कालीन नगरअभियंता सुभाष बळीराम सावस्कर यांची सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषमुक्तता
Hdhd


सोलापूर, 17 जुलै (हिं.स.)। महापालिकेतील पाच महत्त्वाच्या फाईली जाणीवपूर्वक गहाळ करून महापालिकेचे नुकसान केल्याच्या आरोपावरून दाखल करण्यात आलेल्या खटल्यातून तत्कालीन नगरअभियंता सुभाष बळीराम सावस्कर यांची सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषमुक्तता केली आहे. पुराव्याचा अभाव आणि खटला चालविण्यासाठी आवश्यक कायदेशीर मान्यता नसल्याचे नमूद करत न्यायालयाने हा निर्णय दिला.

सन २०१३ मध्ये तत्कालीन महापालिका आयुक्त गुडेवार यांनी सदर बझार पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार, २००९ ते २०१३ या कालावधीत नगरअभियंता म्हणून कार्यरत असताना सुभाष सावस्कर आणि भूमी व मालमत्ता विभागातील अन्य तीन कर्मचाऱ्यांनी संगनमत करून पाच महत्त्वाच्या फाईली जाणीवपूर्वक गहाळ केल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणात पोलिसांनी तपास पूर्ण करून २८ डिसेंबर २०१६ रोजी आरोपपत्र दाखल केले होते.

या आरोपपत्राविरोधात सावस्कर यांनी ॲड. शशि कुलकर्णी यांच्यामार्फत दोषमुक्तीचा अर्ज दाखल केला. नगरअभियंता हे तांत्रिक पद असून संबंधित फाईलींचा ताबा त्यांच्या अधिकारात नव्हता, तसेच त्यांच्याविरोधात कोणताही ठोस पुरावा उपलब्ध नसल्याचा युक्तिवाद करण्यात आला. याशिवाय खटला दाखल करण्यासाठी आवश्यक कायदेशीर मंजुरीही नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले.

मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी दोषमुक्तीचा अर्ज फेटाळल्यानंतर सावस्कर यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात पुनर्विलोकन याचिका दाखल केली. सत्र न्यायालयात झालेल्या सुनावणीत बचाव पक्षाने पुराव्याचा अभाव आणि कायदेशीर त्रुटी अधोरेखित केल्या, तर सरकारी पक्षाने दोषमुक्तीला विरोध केला.

प्रकरणातील कागदपत्रे, उच्च न्यायालयाचे आदेश, उपलब्ध पुरावे आणि कायदेशीर बाबींचा विचार करून जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. डी. गावडे यांनी सावस्कर यांच्याविरोधात खटला पुढे चालविणे हे न्यायालयीन प्रक्रियेचा गैरवापर ठरेल, असे निरीक्षण नोंदवत त्यांना दोषमुक्त करण्याचा आदेश दिला.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande