पत्नीच्या छळप्रकरणी पतीसह चौघे दोषी; २३ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर प्रत्येकी तीन वर्षांची सक्तमजुरी
लातूर, 17 जुलै (हिं.स.)। उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात २००३ मध्ये दाखल झालेल्या पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ तसेच हुंड्यासाठी त्रास दिल्याच्या प्रकरणात तब्बल २३ वर्षांच्या न्यायालयीन प्रक्रियेनंतर चार आरोपींना दोषी ठरवत न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे
न्यायालयाचा निकाल


लातूर, 17 जुलै (हिं.स.)।

उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात २००३ मध्ये दाखल झालेल्या पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ तसेच हुंड्यासाठी त्रास दिल्याच्या प्रकरणात तब्बल २३ वर्षांच्या न्यायालयीन प्रक्रियेनंतर चार आरोपींना दोषी ठरवत न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे.

फिर्यादी सीमा ईश्वर शेरे (रा. शिवाजीनगर, मुखेड, जि. नांदेड) यांच्या तक्रारीनुसार, विवाहानंतर काही काळ संसार सुरळीत सुरू होता. मात्र मुलगी झाल्यानंतर आरोपींनी माहेरहून दूरदर्शन संच, शीतकपाट आणि दुचाकी आणण्याची मागणी करत शारीरिक व मानसिक छळ सुरू केला. पतीकडून चारित्र्यावर संशय घेणे, शिवीगाळ करणे आणि इतर कारणांवरून त्रास दिल्याचा आरोपही करण्यात आला होता. याप्रकरणी २ फेब्रुवारी २००३ रोजी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम ४९८(अ), ५०६ सह ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, पहिले न्यायालय, उदगीर येथील न्यायालयाने आरोपी ईश्वर गुरुनाथ शेरे, गुरुनाथ नागशेटी शेरे, शिवानंद गुरुनाथ शेरे आणि संगीता ऊर्फ उर्मिला लक्ष्मण गोडबोले यांना दोषी ठरवत कलम ४९८(अ) सह ३४ अंतर्गत प्रत्येकी तीन वर्षांची सक्तमजुरी आणि कलम ५०६ सह ३४ अंतर्गत दोन वर्षांची शिक्षा सुनावली. दोन्ही शिक्षा एकत्रितपणे भोगण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

या प्रकरणाचा तपास तत्कालीन सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक डी. डी. कांबळे यांनी केला होता. सरकार पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता अॅड. ए. एस. कदम यांनी युक्तिवाद केला. न्यायालयीन कामकाजात पोलीस अंमलदार अक्रम शेख व जगताप यांनी सहकार्य केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande