
मुंबई, 17 जुलै, (हिं.स.)। गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुपचा विविधता, समानता आणि सर्वसमावेशकता उपक्रम असलेल्या गोदरेज डीईआय लॅबने आपला नवीन संशोधन अहवाल प्रसिद्ध केला आहे. दिव्यांग सन्मान महिन्याचे औचित्य साधून हा अहवाल जाहीर करण्यात आला आहे. ‘अक्सेसिबिलिटी एण्ड इन्क्लुजन इन इंडियन कॉर्पोरेट वर्कप्लेस: डिझायनिंग वर्कप्लेसेस दॅट फॉर एव्हरीवन’ असे या अहवालाचे नाव आहे.
हा अहवाल लॅबच्या संशोधिका पुष्पामी कस्तुरे यांनी तयार केला आहे. विविध उद्योगांतील दिव्यांग कर्मचारी, मानव संसाधन, अक्सेसिबिलिटी सल्लागार, वास्तुविशारद आणि डीईआय क्षेत्रातील तज्ज्ञांनी एकत्रितरित्या मिळून हा अहवाल तयार केला आहे. फिजिकल असेसिबिलिटी विषयांत कंपन्यांनी चांगली प्रगती केल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले. मात्र, कर्मचा-यांसमोरील सर्वात मोठे अडथळे अजूनही स्पष्ट नसून, हे अडथळे डिजिटल प्रणाली आणि कार्यालयीन संस्कृतीत रुजलेले आहेत, असेही या अहवालात स्पष्टपणे मांडण्यात आले आहे.
दिव्यांग सर्वसमावेशकता आता व्यावसायिक गरज बनली आहे. हा केवळ सामाजिक नियम उरलेला नाही. इंडिया ब्रँण्ड इक्विटी फाऊंडेशनच्या अहवालानुसार, भारतातील अंदाजे ३ कोटी दिव्यांगांपैकी केवळ ११.३ टक्के लोकांनाच रोजगार मिळाला आहे. तसेच, काम करण्यास सक्षम असलेले तब्बल ७० टक्के दिव्यांग आजही बेरोजगार आहेत. दिव्यांगांना सामावून घेणा- कंपन्यांचा महसूल इतर कंपन्यांपेक्षा २८ टक्क्यांनी जास्त नोंदवण्यात आला आहे. या कंपन्यांचा नफाही ३० टक्क्यांनी जास्त असतो. त्यांचे निव्वळ उत्तन्न जवळपास दुप्पट असते. सर्वांना कामाच्या ठिकाणी सुलभता देणे, हा सर्वसमावेशक नियम आहे. शिवाय दिव्यांगांना कामात समाविष्ट केल्याने व्यवसायवृद्धी होते, असे या अहवालात अधोरेखित करण्यात आले आहे.
सुलभता ही रॅम्प आणि पायाभूत सुविधांच्या उभारणीपुरती मर्यादित नसते. कार्यालयीन ठिकाणे सर्वसमावेशक बनवण्यासाठी गोदरेज डीईआय लॅबच्या अहवालात ठोस उपाययोजना सूचवण्यात आल्या आहेत. यामध्ये दिव्यांगस्नेही एचआर प्लॅटफॉर्म्स, कॅप्शन सुविधा असलेल्या बैठका आणि संवेदनशील संवादाचा समावेश करण्यात आला आहे. दिव्यांगांना आत्मविश्वासाने सहभाग घेत स्वतःची प्रगती साधता येईल, अशी कार्यसंस्कृती निर्माण करण्याची शिफारस करण्यात आली आहे. या मुद्द्यांना पुष्टी देत, दिव्यांग कर्मचा-यांनी त्यांचे अनुभव मांडले आहेत. माहिती, संवाद आणि कार्यसंस्कृतीमध्ये जाणीवपूर्वक केलेले छोटे आमूलाग्र बदल दिव्यांना फायदेशीर ठरतात. या बदलांमुळे कार्यालयीन ठिकाणी दिव्यांगांचा सहभाग वाढू शकतो. या बदलांमुळे त्यांचे स्वावलंबी करिअर घडते.
नुकताच या अहवालाचा प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी गोदरेज डीईआय लॅबचे प्रमुख परमेश शाहनी म्हणाले, “अनेकदा अक्सेसिबिलीटी विषयाला पायाभूत सुविधांचा मर्यादित दृष्टीकोनातून पाहिले जाते. सर्वसमावेशक कार्यालयीन ठिकाणाच्या उभारणीसाठी तंत्रज्ञान, संवाद आणि कार्यसंस्कृती या तिन्ही घटकांची भूमिका महत्त्वाची असते, हे आमच्या संशोधनातून सिद्ध होते. या तिन्ही घटकांना रॅम्प आणि लिफ्टएवढेच महत्त्व आहे. कंपनीच्या विकासात सर्वसमावेशकता रुजवू इच्छिणा-या व्यावसायिक नेत्यांसाठी हा अहवाल उपयुक्त आणि मार्गदर्शक ठरेल, अशी आम्हांला आशा आहे.“
गोदरेज डीईआय लॅबच्या अहवालात चार प्रमुख स्तंभांची संकल्पना मांडण्यात आली आहे. यात भौतिक, डिजिटल, संवाद आणि वर्तणूक अशा चार स्तरांवरील अक्सेसिबिलिटी घटकांचा समावेश आहे. कंपन्यांना हा आराखडा नियमांचे पालन करण्यापलीकडे जाऊन ठोस कृती आराखडा तयार करण्यास मदत करतो. यामुळे कामाच्या ठिकाणी तंत्रज्ञान आणि कार्यसंस्कृतीच्या जडणघडणीत दीर्घकालीन सर्वसमावेशकता रुजेल, अशा विश्वासही व्यक्त करण्यात आला आहे. अक्सेसिबिलिटी एण्ड इन्क्लुजन इन इंडियन कॉर्पोरेट वर्कप्लेसेस अहवाल www.godrejdeilab.com या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule