
मुंबई, 20 जुलै (हिं.स.) : भारतातील वापरानंतर टाकून दिल्या जाणाऱ्या कापडाच्या कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करण्याच्या उद्देशाने OterRi च्या सहकार्याने कार्यरत ReFiber ने भारत टेक्स २०२६ मध्ये ‘मुंबई टेक्सटाईल सर्क्युलर इकॉनॉमी डेमॉन्स्ट्रेशन प्रोजेक्ट’ या उपक्रमाचा सविस्तर अहवाल सादर केला. CMAI आणि GATS यांच्या Eco Stitch Sustainability and Circularity Hub मध्ये हा अहवाल सादर करण्यात आला. हा अहवाल जागतिक पर्यावरण दिन २०२६ रोजी सुरू झालेल्या ‘मुंबई टेक्सटाईल सर्क्युलर इकॉनॉमी डेमॉन्स्ट्रेशन प्रोजेक्ट’ या उपक्रमावर आधारित आहे. OterRi, Tisser, CMAI, UNIDO, World Trade Center Mumbai आणि Lions International यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमातून २.७ टन वापरलेले कापड संकलित करण्यात आले. २५७ नागरिकांनी सहभाग घेत २७५ संकलन ऑर्डर्स दिल्या. १५ लॉन्ड्री भागीदारांच्या २८ शाखांमधून हे संकलन करण्यात आले. शहरातील उपलब्ध सेवा व्यवस्थेचा वापर करून वापरलेल्या कापडाचे प्रभावी संकलन करता येते, हे या उपक्रमातून सिद्ध झाले. या अहवालात भारतातील वस्त्र पुनर्वापर व्यवस्थेतील प्रमुख अडचणी आणि त्यावर तंत्रज्ञानाच्या मदतीने करता येणारे उपाय मांडण्यात आले आहेत. तसेच महिला बचत गट, अपसायकलिंग उद्योग आणि स्थानिक व्यवसायांना या उपक्रमातून कसा फायदा होऊ शकतो, हेही स्पष्ट करण्यात आले आहे.
ReFiber Initiative चे अध्यक्ष श्रीकांत भांगडिया म्हणाले, भारतातील वस्त्रोद्योग हा आपल्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि ओळखीचा महत्त्वाचा भाग आहे. वापरानंतर टाकून दिलेल्या कापडाला पुन्हा उपयुक्त संसाधनात बदलण्यासाठी पारदर्शक, विश्वासार्ह आणि विस्तार करता येईल अशी व्यवस्था उभारण्याचा आमचा प्रयत्न आहे. नवी मुंबईतील या प्रकल्पातून तंत्रज्ञान, नागरिकांचा सहभाग आणि विविध संस्थांचे सहकार्य यांच्या मदतीने पर्यावरण, समाज आणि अर्थव्यवस्थेला लाभ होऊ शकतो, हे सिद्ध झाले आहे. महाराष्ट्र आणि भारतासाठी शाश्वत वस्त्र व्यवस्थापनाचा हा महत्त्वाचा टप्पा आहे.
OterRi आणि ReFiber चे COO मनोज वानवरी म्हणाले, मुंबई टेक्सटाईल सर्क्युलर इकॉनॉमी डेमॉन्स्ट्रेशन प्रोजेक्ट हा आमच्यासाठी महत्त्वाचा टप्पा आहे. तंत्रज्ञान, डेटा आणि विविध संस्थांच्या सहकार्याच्या माध्यमातून वस्त्र पुनर्वापराचे प्रभावी मॉडेल उभे करण्याचा आमचा प्रयत्न आहे. पुढील काळात हे मॉडेल शहर, राज्य आणि देशभर विस्तारण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. डिजिटल ट्रॅकिंग, संघटित संकलन व्यवस्था आणि सर्व घटकांचा सहभाग यांच्या मदतीने भारतातील वस्त्र कचऱ्याच्या समस्येवर प्रभावी उपाय उभा करता येईल.
भारत टेक्स २०२६ मध्ये हा अहवाल वस्त्रोद्योग मंत्रालय, UNIDO, CMAI, GATS तसेच विविध सरकारी आणि उद्योग क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत सादर करण्यात आला. नवी मुंबईतील या यशस्वी उपक्रमानंतर ReFiber आता मुंबई महानगर प्रदेश, महाराष्ट्र आणि पुढे संपूर्ण देशात हा उपक्रम विस्तारण्याची योजना आखत आहे. तंत्रज्ञान, डिजिटल ट्रॅकिंग आणि संघटित संकलन व्यवस्थेच्या मदतीने वापरलेल्या कापडाचा पुनर्वापर वाढवून शाश्वत भविष्य घडवण्याचा ReFiber चा प्रयत्न आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी