
विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज करण्याचे सामाजिक न्याय विभागाचे आवाहन
छत्रपती संभाजीनगर, 17 जुलै (हिं.स.) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या अधिपत्याखाली कार्यरत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह, लोहारा येथील मुलांच्या शासकीय वसतिगृहासाठी शैक्षणिक वर्ष 2026-27 ची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.
पात्र विद्यार्थ्यांनी शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना आवश्यक कागदपत्रे अचूकपणे अपलोड करणे बंधनकारक राहणार आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासकीय वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक व मूलभूत सुविधा विनामूल्य उपलब्ध करून दिल्या जातात. यामध्ये मोफत निवास, शालेय विद्यार्थ्यांना मोफत स्टेशनरी साहित्य, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना स्टेशनरीसाठी वार्षिक चार हजार रुपये, शालेय विद्यार्थ्यांना ड्रेस कोडसाठी एक हजार रुपये, तर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना दोन हजार रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते.
याशिवाय प्रवेशित विद्यार्थ्यांना दरमहा एक हजार रुपये निर्वाह भत्ता, सकस व पौष्टिक भोजन, सुरक्षित व शैक्षणिक वातावरण, शुद्ध पिण्याचे पाणी, वीज, स्वच्छ वसतिगृह, अध्ययन कक्ष, ग्रंथालय, संगणक व इंटरनेट सुविधा, क्रीडा साहित्य तसेच सांस्कृतिक व व्यक्तिमत्त्व विकास उपक्रमांची सुविधा उपलब्ध करून दिली जाते.
स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी पुस्तके, वर्तमानपत्रे, स्पर्धा परीक्षा विषयक मासिके तसेच शासनाच्या नियमानुसार इतर विविध सुविधा विद्यार्थ्यांना पुरविण्यात येतात. त्यामुळे ग्रामीण भागातील तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण घेण्यासाठी मोठी मदत होत आहे.
इयत्ता आठवीपासून पदव्युत्तर शिक्षण घेणारे आणि समाज कल्याण विभागाच्या नियमानुसार पात्र विद्यार्थी या प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. दरम्यान, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी शासकीय वसतिगृहाचा ऑनलाइन प्रवेश अर्ज भरणे आवश्यक आहे. शासकीय वसतिगृहाचा अर्ज न भरल्यास स्वाधार शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार नाही, याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी, असे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या सहायक आयुक्तांनी कळविले आहे.
---------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis