
मुंबई, 17 जुलै (हिं.स.)। हिंदुजा फाउंडेशनच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या के. पी. बी. हिंदुजा कॉलेज ऑफ कॉमर्स (ऑटोनॉमस)ने हल्ट इंटरनॅशनल बिझनेस स्कूलच्या दुबई कॅम्पसबरोबर सामंजस्य करार (एमओयू) केला आहे. या करारामुळे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण, नेतृत्व विकास, उद्योगांशी संबंधित प्रत्यक्ष अनुभव आणि आंतरराष्ट्रीय शैक्षणिक संधी उपलब्ध होणार आहेत. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून ही भागीदारी प्रत्यक्षात कार्यान्वित होणार असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा मिळणार आहे.
या सहकार्यांतर्गत विद्यार्थ्यांना फॅकल्टी-नेतृत्वाखालील वर्कशॉप्स, बिझनेस चॅलेंजेस, मेंटरशिप, लीडरशिप प्रोग्राम्स, आंतरराष्ट्रीय एक्स्पोजर तसेच एक्स्पिरिएन्शियल लर्निंगच्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी होता येणार आहे. याशिवाय बोस्टन, सॅन फ्रान्सिस्को, ॲशरिज, न्यूयॉर्क, लंडन आणि दुबईसारख्या शहरांमध्ये उद्योगांशी निगडित अनुभव मिळवण्याची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध होईल.
या कराराचा आणखी एक महत्त्वाचा लाभ म्हणजे के. पी. बी. हिंदुजा कॉलेजने शिफारस केलेल्या आणि निवड झालेल्या विद्यार्थ्यांना हल्ट इंटरनॅशनल बिझनेस स्कूलच्या विविध जागतिक कॅम्पसमध्ये उच्च शिक्षणासाठी अंशतः आर्थिक सहाय्य आणि शिष्यवृत्ती मिळण्याची संधी असेल. विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता, नेतृत्व क्षमता, अभ्यासाबाहेरील उपक्रमांतील सहभाग, एकूण व्यक्तिमत्त्व आणि हल्टच्या प्रवेश निकषांच्या आधारे ही शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. त्यामुळे गुणवंत विद्यार्थ्यांसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील पदव्युत्तर शिक्षण अधिक सुलभ होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
या भागीदारीअंतर्गत दोन्ही संस्था मिळून शॉर्ट-टर्म इंटरनॅशनल इमर्शन प्रोग्राम्स, समर आणि विंटर स्कूल्स, इंडस्ट्री व्हिजिट्स, मास्टरक्लासेस तसेच विविध जागतिक कॅम्पसमध्ये अल्पकालीन शैक्षणिक उपक्रम राबविणार आहेत.
के. पी. बी. हिंदुजा कॉलेज ऑफ कॉमर्सचे प्राचार्य डॉ. नवीन पंजाबी यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांचे शिक्षण केवळ वर्गखोल्यांपुरते मर्यादित न ठेवता त्यांना प्रत्यक्ष अनुभव, कौशल्य विकास आणि जागतिक दृष्टीकोन देणे हे महाविद्यालयाचे उद्दिष्ट आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, बदलांशी जुळवून घेण्याची क्षमता आणि व्यावसायिक तयारी अधिक सक्षम होईल.
हल्ट इंटरनॅशनल बिझनेस स्कूलच्या साउथ एशिया विभागाच्या सीनियर डायरेक्टर ऑफ एनरोलमेंट श्रेया शर्मा यांनी सांगितले की, प्रत्यक्ष अनुभवातून शिकणे हीच भविष्यातील नेतृत्व घडविण्याची सर्वोत्तम पद्धत आहे. या सहकार्यामुळे विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे बिझनेस शिक्षण, व्यावहारिक कौशल्ये आणि आंतरराष्ट्रीय संधींचा लाभ मिळेल.
१९७४ मध्ये स्थापन झालेल्या के. पी. बी. हिंदुजा कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये आज सात हजारांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत असून ज्युनिअर कॉलेजपासून डॉक्टरेटपर्यंत १७ हून अधिक अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. तर हल्ट इंटरनॅशनल बिझनेस स्कूल ही जगातील प्रतिष्ठित बिझनेस स्कूलपैकी एक मानली जाते. ट्रिपल क्राउन अॅक्रेडिटेशन प्राप्त असलेल्या या संस्थेचे जागतिक स्तरावर विस्तृत माजी विद्यार्थी जाळे असून विद्यार्थ्यांना आधुनिक, उद्योगाभिमुख आणि जागतिक दर्जाचे शिक्षण देण्यासाठी ती ओळखली जाते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule