
सोलापूर, 17 जुलै (हिं.स.)। मध्य रेल्वेच्या कर्जत-लोणावळा दरम्यानचा दक्षिण-पूर्व डाऊन मार्ग १४ जुलैपासून पूर्णपणे पूर्ववत झाल्याने सोलापूर विभागातील रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. यापूर्वी ७ जुलै रोजी मध्य मार्गिका सुरू करण्यात आली होती. आता दोन्ही मार्ग वाहतुकीसाठी खुले झाल्याने मुंबईकडे धावणाऱ्या महत्त्वाच्या गाड्या पुन्हा त्यांच्या मूळ मार्गावरून धावणार आहेत.
या बदलानुसार गाडी क्रमांक ११३०२ बंगळुरू–सीएसएमटी उद्यान एक्स्प्रेस तसेच सिद्धेश्वर एक्स्प्रेस (१२११६) या गाड्या सीएसएमटी मुंबईपर्यंत नियमितपणे धावतील. तसेच गाडी क्रमांक ११३०१ सीएसएमटी मुंबई–बंगळुरू उद्यान एक्स्प्रेस १८ जुलैपासून सीएसएमटी मुंबई येथूनच सुटणार आहे.
दरम्यान, उन्हाळी सुट्टीतील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने या विभागातील १० विशेष रेल्वेगाड्यांची सेवा जुलै अखेरपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. यात सोलापूर–लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) साप्ताहिक, सोलापूर–अनकापल्ले साप्ताहिक, सोलापूर–दौंड, सोलापूर–कलबुर्गी आणि हडपसर–हरंगूळ या विशेष गाड्यांचा समावेश आहे.
या निर्णयामुळे मुंबईसह विविध मार्गांवर प्रवास करणाऱ्या सोलापूर विभागातील हजारो रेल्वे प्रवाशांची गैरसोय दूर होणार असून रेल्वे वाहतूक पुन्हा सुरळीत होण्यास मदत होणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड