सोलापूर : अंकोली गावातील गोठ्यात लपवलेला २०.१९ लाखांचा गांजा जप्त
सोलापूर, 17 जुलै, (हिं.स.)। सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि मोहोळ पोलिसांनी संयुक्त कारवाई करत अंकोली गावातील एका शेतातील गायीच्या गोठ्यात लपवून ठेवलेला २० लाख १९ हजार २५० रुपयांचा गांजा जप्त केला. या कारवाईत पोलिसांनी मुख्य संश
SP


सोलापूर, 17 जुलै, (हिं.स.)। सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि मोहोळ पोलिसांनी संयुक्त कारवाई करत अंकोली गावातील एका शेतातील गायीच्या गोठ्यात लपवून ठेवलेला २० लाख १९ हजार २५० रुपयांचा गांजा जप्त केला. या कारवाईत पोलिसांनी मुख्य संशयित भैरवनाथ भोसले याला ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध अमली पदार्थविरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पंढरपूर आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मोहोळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना पोलिस हवालदार विजयकुमार भरले यांना गोपनीय माहिती मिळाली की, अंकोली गावातील एका शेतातील गोठ्यात मोठ्या प्रमाणात गांजा साठवून ठेवण्यात आला आहे.

या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली, सहायक पोलिस निरीक्षक भीमगोंडा पाटील आणि मोहोळ पोलिस निरीक्षक दीपक पाटील यांच्या पथकाने संबंधित गोठ्यावर छापा टाकला. झडतीदरम्यान प्लास्टिकच्या दोन पोत्यांमध्ये भरून ठेवलेला ४० किलो ३८५ ग्रॅम ओला व सुका गांजा आढळून आला. पोलिसांनी हा साठा जप्त करून त्याची अंदाजे किंमत २० लाख १९ हजार २५० रुपये असल्याचे सांगितले.

या प्रकरणी भैरवनाथ भोसले याच्याविरुद्ध मोहोळ पोलिस ठाण्यात अमली पदार्थ प्रतिबंधक (एनडीपीएस) कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, गांजाचा साठा कुठून आणला आणि त्यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande