अमरावतीत २४ जुलैपासून हेल्मेट सक्ती , नियम न पाळल्यास परवाना निलंबन
अमरावती, 17 जुलै (हिं.स.)।दुचाकी अपघातात वाढणाऱ्या मृत्यूंच्या पार्श्वभूमीवर अमरावती शहर पोलीस आयुक्तालयाने मोठा निर्णय घेतला आहे. शहर हद्दीतील सर्व राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग तसेच शहरी आणि ग्रामीण रस्त्यांवर २४ जुलै २०२६ पासून दुचाकी चालक
अमरावतीत २४ जुलैपासून हेल्मेट सक्ती अधिसूचना जारी, नियम न पाळल्यास दंडासह परवाना निलंबन


अमरावती, 17 जुलै (हिं.स.)।दुचाकी अपघातात वाढणाऱ्या मृत्यूंच्या पार्श्वभूमीवर अमरावती शहर पोलीस आयुक्तालयाने मोठा निर्णय घेतला आहे. शहर हद्दीतील सर्व राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग तसेच शहरी आणि ग्रामीण रस्त्यांवर २४ जुलै २०२६ पासून दुचाकी चालक आणि मागे बसणाऱ्या दोघांनाही आयएसआय मार्क असले हेल्मेट घालणे बंधनकारक केले आहे. याबतची अधिसूचना पोलीस उपायुक्त शाम घुगे यांनी जारी केली आहे.

पोलीस प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार सन २०२४ मध्ये अमरावती शहर हद्दीत ४५४ अपघात झाले होते. २०२५ मध्ये ४१७ अपघातांची नोंद झाली. तर १ जानेवारी २०२६ ते ३० जून २०२६ या कालावधीतच २१० अपघात झाले आहेत. एकूण प्राणघातक अपघातांपैकी सुमारे ६० टक्के अपघात हे दुचाकी चालकांचे आहेत. या अपघातांमध्ये डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. मोटर वाहन कायदा १९८८ च्या कलम १२९ नुसार सुधारित २०१९ च्या कायद्यात दुचाकी चालक आणि पाठीमागे बसणाऱ्या व्यक्तीला हेल्मेट वापरणे कायदेशीर बंधनकारक आहे.

अपघातातील मृत्यूचे प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने ही सक्ती लागू करण्यात येत असल्याचे पोलिस प्रशासनाचे म्हणणे आहे.२४ जुलैपासून वाहतूक 'विभागामार्फत शहरभर विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. विनाहेल्मेट आढळणाऱ्या दुचाकी चालक आणि पाठीमागील व्यक्तीवर मोटर वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई केली जाईल. वारंवार नियमभंग करणाऱ्यांचा ड्रायव्हिंग लायसन्स ३ महिन्यांसाठी निलंबित केला जाऊ शकतो. हेल्मेट हा केवळ दंडापासून वाचण्याचा उपाय नसून तो स्वतःच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षेचे कवच आहे. सुरक्षित प्रवास, सुरक्षित परिवार या ब्रीदवाक्यासह जबाबदार नागरिक म्हणून सर्वांनी या. मोहिमेला सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस विभागातर्फे करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande