राज्यात सोमवारी वैद्यकीय सेवा 24 तास बंद
डोंबिवलीतील डॉक्टरांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ पुकारला बंद नागपूर, 17 जुलै (हिं.स.) : डोंबिवली येथील शास्त्रीनगर महापालिका रुग्णालयात डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) महाराष्ट
वैद्यकीय संप लोगो


डोंबिवलीतील डॉक्टरांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ पुकारला बंद

नागपूर, 17 जुलै (हिं.स.) : डोंबिवली येथील शास्त्रीनगर महापालिका रुग्णालयात डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) महाराष्ट्र राज्य शाखेने 20 जुलै रोजी राज्यव्यापी 24 तासांच्या वैद्यकीय सेवा बंदची घोषणा केली आहे. हा बंद सोमवारी 20 जुलै रोजी सकाळी 6 वाजेपासून मंगळवारी 21 जुलै रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत राहणार आहे.

आयएमएच्या आवाहनाला ॲलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी या सर्व वैद्यकीय शाखांतील डॉक्टर, परिचारिका संघटना तसेच पॅरामेडिकल कर्मचारी यांनी पाठिंबा दर्शविला आहे. बंददरम्यान राज्यातील सर्व रुग्णालयांमधील बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) आणि नियोजित शस्त्रक्रिया स्थगित राहतील. मात्र, आपत्कालीन सेवा, अतिदक्षता विभाग (आयसीयू), प्रसूती सेवा आणि अन्य जीवनावश्यक उपचार नियमितपणे सुरू राहतील, असे आयएमएने स्पष्ट केले आहे.डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना सुरक्षित व निर्भय वातावरण मिळावे, हा या आंदोलनाचा मुख्य उद्देश असल्याचे आयएमएने नमूद केले आहे. संघटनेने सरकारकडे डोंबिवलीतील हल्ल्याप्रकरणी आरोपींवर कोणत्याही राजकीय हस्तक्षेपाशिवाय तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

याशिवाय, 'महाराष्ट्र मेडीकेअर सेवा व्यक्ती आणि मेडीकेअर सेवा संस्था कायदा, 2010' अधिक कडक करण्यासाठी तातडीने सुधारणा करण्याची मागणी करण्यात आली आहे. अजामीनपात्र गुन्ह्याची तरतूद, फास्ट ट्रॅक न्यायालयांतून खटल्यांचा निपटारा आणि सर्व रुग्णालयांमध्ये 24 तास सुरक्षा व्यवस्था सक्तीची करण्याची मागणीही करण्यात आली आहे. सरकारने 9 ऑगस्ट पर्यंत या मागण्यांवर सकारात्मक निर्णय न घेतल्यास 'युनायटेड मेडिकल फ्रंट'च्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र बेमुदत आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आयएमए महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डॉ. संतोष कुलकर्णी आणि सचिव डॉ. विक्रांत देसाई यांनी दिला आहे.

-------------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande