लातूर : अहमदपूरमध्ये मोकाट कुत्र्यांची दहशत; तातडीच्या उपाययोजनांची मागणी
लातूर, 17 जुलै (हिं.स.)। शहरामध्ये मोकाट आणि भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे नागरिकांना रस्त्यावरून ये-जा करताना मोठ्या प्रमाणात त्रास स
माझी गटनेते सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी


लातूर, 17 जुलै (हिं.स.)। शहरामध्ये मोकाट आणि भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे नागरिकांना रस्त्यावरून ये-जा करताना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असून, कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटनांमध्येही सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे शहरातील या भटक्या व मोकाट कुत्र्यांचा नगर परिषदेने तातडीने बंदोबस्त करावा, अशी आग्रही मागणी माजी गटनेते तथा नगरसेवक डॉ. सिद्धार्थकुमार सूर्यवंशी आणि नगरसेविका तनुजा सूर्यवंशी यांनी केली आहे.

या गंभीर समस्येबाबत नगर परिषद प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी डॉ. सिद्धार्थकुमार सूर्यवंशी आणि तनुजा सूर्यवंशी यांच्या वतीने अहमदपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना नुकतेच एक लेखी निवेदन सादर करण्यात आले आहे. यापूर्वीही या प्रश्नासंदर्भात नगर परिषदेकडे वारंवार निवेदन देऊनही प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही. प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शहरातील मोकाट कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करून नागरिकांच्या जीवित व सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, तसेच या कुत्र्यांच्या नियंत्रणासाठी शहरात एक प्रभावी मोहीम राबविण्यात यावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

नगर परिषद प्रशासनाने मोकाट कुत्र्यांच्या या प्रश्नाची अत्यंत गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कार्यवाही करावी आणि प्रशासनाकडून करण्यात आलेल्या या कार्यवाहीची माहिती नागरिकांसमोर जाहीर करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. सादर करण्यात आलेल्या या निवेदनावर अहमदपूर नगर परिषदेचे माजी गटनेते डॉ. सिद्धार्थकुमार सूर्यवंशी आणि नगरसेविका तनुजा सूर्यवंशी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande