
रायगड, 17 जुलै (हिं.स.)। : म्हसळा तालुक्यातील नवानगर येथे अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून बेडच्या कप्प्यात ठेवलेली 6 लाख 23 हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या राहत्या घरातील बेडच्या कप्प्यात 6,23,000 रुपयांची रोख रक्कम ठेवण्यात आली होती. फिर्यादी यांच्या अनुपस्थितीचा किंवा निष्काळजीपणाचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून ही रक्कम लंपास केली. चोरी झाल्याचे लक्षात येताच फिर्यादी यांनी तत्काळ म्हसळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या प्रकरणी म्हसळा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 106/2026 दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 च्या कलम 305 अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
घटनास्थळाची पाहणी करून पोलिसांनी तपास सुरू केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, संशयितांची माहिती आणि इतर पुराव्यांच्या आधारे अज्ञात चोरट्याचा शोध सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष भुंडेरे करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)