
रत्नागिरी, 17 जुलै (हिं.स.) । दाभोळे–लांजा, रूण, साटवली–राजापूर राज्य मार्गालगत भू (ता. राजापूर) परिसरातील कथित अनधिकृत बांधकामप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागाने सुमारे १५ व्यापाऱ्यांना बांधकामे हटविण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. या कारवाईमुळे व्यापारी व ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंत्यांनी दिलेल्या नोटिशीत संबंधितांनी राज्य मार्गाच्या हद्दीत गाळे व दुकाने उभारल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. शासनाच्या नियमानुसार रस्त्यालगत निश्चित अंतर राखणे बंधनकारक असून, संबंधित बांधकामे नियमबाह्य असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे ही बांधकामे तातडीने हटविण्याचे निर्देश देण्यात आले असून, अन्यथा भविष्यात उद्भवणाऱ्या परिणामांना संबंधित मालमत्ताधारक स्वतः जबाबदार राहतील, असा इशाराही नोटिशीत देण्यात आला आहे.
दरम्यान, गेल्या तीन दशकांहून अधिक काळ या ठिकाणी स्थानिक व्यापारी व्यवसाय करत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. नोटिसा मिळालेल्या व्यापाऱ्यांच्या पाठीशी आपण ठामपणे उभे असल्याचे सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थांनी स्पष्ट केले आहे.
ज्यांना नोटिसा मिळाल्या आहेत त्यांनी घाबरण्याचे कारण नाही. जागा आमच्या हक्काची असून आम्ही आमच्या हक्काच्या जागेत आहोत. संबंधित यंत्रणा पुढे कोणती कारवाई करते, ते पाहू, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी