आषाढी यात्रेनिमित्त विठुरायाचे २४ तास दर्शन सुरू; ३ ऑगस्टपर्यंत भाविकांना अखंड दर्शनसुविधा
सोलापूर, 17 जुलै (हिं.स.)।येत्या २५ जुलै रोजी होणाऱ्या आषाढी एकादशी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देश-विदेशातून मोठ्या संख्येने भाविक पंढरपुरात दाखल होत आहेत. या भाविकांना सुलभ आणि अखंड दर्शन मिळावे यासाठी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने २४ तास दर्
Vithal


सोलापूर, 17 जुलै (हिं.स.)।येत्या २५ जुलै रोजी होणाऱ्या आषाढी एकादशी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देश-विदेशातून मोठ्या संख्येने भाविक पंढरपुरात दाखल होत आहेत. या भाविकांना सुलभ आणि अखंड दर्शन मिळावे यासाठी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने २४ तास दर्शन व्यवस्था सुरू केली आहे.

मंदिर समितीच्या निर्णयानुसार ३ ऑगस्ट रोजी होणाऱ्या प्रक्षाळपूजेपर्यंत विठुरायाचे दर्शन अखंड सुरू राहणार आहे. त्यामुळे कमी वेळेत अधिकाधिक भाविकांना श्री विठ्ठलाच्या दर्शनाचा लाभ घेता येणार आहे.

मंदिरात श्री विठ्ठलाच्या मूर्तीच्या पाठीशी लोड, तर श्री रुक्मिणी मातेच्या मूर्तीच्या पाठीशी तक्क्या देण्यात आला आहे. यामुळे आजपासून श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे २४ तास मुखदर्शन, तर २२ तास १५ मिनिटे पदस्पर्श दर्शन सुरू राहणार असल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.

औसेकर महाराज म्हणाले की, आषाढी यात्रा कालावधीत ‘श्रीं’चा पलंग काढल्यानंतर काकड आरती, पोशाख, धूपारती आणि शेजारती यांसारखे राजोपचार तात्पुरते बंद राहतील. मात्र, नित्यपूजा, महानैवेद्य आणि गंधाक्षता हे नित्योपचार नियमितपणे सुरू राहतील.

आषाढी यात्रेदरम्यान लाखो भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन मंदिर समितीने ही विशेष व्यवस्था केली असून, ३ ऑगस्टपर्यंत भाविकांना दिवसरात्र अखंड दर्शनाची सुविधा उपलब्ध राहणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande