
बीड, १७ जुलै (हिं.स.) : बीड जिल्हा नियोजन समितीच्या बहुप्रतीक्षित बैठकीला अद्यापही मुहूर्त मिळालेला नसून, येत्या शनिवार-रविवारी होण्याची शक्यता असलेली बैठक पुन्हा एकदा पुढे ढकलली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. पालकमंत्री तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या १९ व २० जुलैदरम्यान बीडमध्ये उपस्थित राहू शकणार नसल्याने ही बैठक आता पुढील आठवड्याच्या शेवटी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
चालू आर्थिक वर्षातील जिल्हा नियोजन समितीची बैठक अधिवेशनासह विविध प्रशासकीय कारणांमुळे वारंवार पुढे ढकलली जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध विभागांचे अधिकारी या बैठकीची प्रतीक्षा करत आहेत.
येत्या आठवड्याच्या शेवटी बैठक घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यानिमित्ताने जिल्ह्यातील काही शासकीय इमारतींच्या उद्घाटनाची तयारीही प्रशासकीय स्तरावर सुरू होती. मात्र, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना मुंबईतील अतिमहत्त्वाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे लागणार असल्याने बीड दौरा पुढे ढकलला जाण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हा नियोजन समितीची बैठक आता पुढील शनिवार किंवा रविवारी, म्हणजेच २५ किंवा २६ जुलै रोजी आयोजित करण्याच्या दृष्टीने प्रशासकीय हालचाली सुरू झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. बैठकीची अधिकृत तारीख लवकरच निश्चित होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
-----------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis