बोगस बियाण्यांमुळे दुबार पेरणीच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा
डीपीडीसी निधीतून मिळणार मोफत बियाणे अमरावती, १७ जुलै (हिं.स.) : बोगस अथवा कमी उगवणक्षम बियाण्यांमुळे दुबार पेरणीच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. जिल्हा नियोजन व विकास समिती (डीपीडीसी) निधीतून पात्र शेतकऱ्यांना
दुबार पेरणीसाठी शेतकऱ्यांना मिळणार बियाणे


डीपीडीसी निधीतून मिळणार मोफत बियाणे

अमरावती, १७ जुलै (हिं.स.) : बोगस अथवा कमी उगवणक्षम बियाण्यांमुळे दुबार पेरणीच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. जिल्हा नियोजन व विकास समिती (डीपीडीसी) निधीतून पात्र शेतकऱ्यांना मोफत बियाणे उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे दुबार पेरणीचा आर्थिक भार काही प्रमाणात कमी होणार असला, तरी उशिरा होणाऱ्या पेरणीमुळे उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता कायम आहे.

अमरावती जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये सोयाबीनच्या बोगस किंवा कमी उगवणक्षम बियाण्यांचा मोठा फटका बसला आहे. अधिक उत्पादनाच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी बियाण्यांची खरेदी करून पेरणी केली; मात्र अनेक ठिकाणी बियाण्यांची उगवण न झाल्याने हजारो शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे.

या प्रकरणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर तक्रारी दाखल झाल्या असून, आतापर्यंत जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाकडे बोगस बियाण्यांच्या १,००७ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. कृषी विभागाने संबंधित बियाणे कंपन्यांविरुद्ध कारवाईची प्रक्रिया सुरू केली असली, तरी शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाई आणि दुबार पेरणीचा खर्च हा मोठा प्रश्न कायम आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन राज्य शासनाने डीपीडीसी निधीतून पात्र शेतकऱ्यांना मोफत बियाणे उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात सर्व पालकमंत्र्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

जिल्ह्यातील पेरणीची स्थिती

अमरावती जिल्ह्यात सरासरी ६ लाख ८२ हजार ९९२ हेक्टर पेरणीक्षेत्र असून, त्यापैकी ५ लाख ६६ हजार ६०७ हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. हे प्रमाण सुमारे ८२ टक्के आहे. यामध्ये १ लाख ७७ हजार ९९७ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी करण्यात आली आहे.

तालुकानिहाय तक्रारी

बोगस बियाण्यांबाबत प्राप्त झालेल्या १,००७ तक्रारींपैकी अमरावती तालुक्यात सर्वाधिक २१६ तक्रारी आहेत. त्याखालोखाल अचलपूर ५६, अंजनगाव सुर्जी ९०, चांदूर रेल्वे १३०, चांदूरबाजार ७९, चिखलदरा ७, तिवसा १३५, नांदगाव खंडेश्वर १३२, भातकुली ६ आणि मोर्शी १३९ तक्रारींची नोंद करण्यात आली आहे.

-------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande