
लातूर, 17 जुलै (हिं.स.)। उदगीर तालुका व भागात जुनच्या मध्यात पावसाने दमदार हजेरी लावून शेतकऱ्यांना सुखावणाऱ्या पावसाने गेल्या काही दिवसांपासून अचानक पाठ फिरवली आहे. पावसाने तोंड लपविल्यामुळे तसेच सध्या कडक उन पडत असल्यामुळे पेरलेली पिके करपण्याच्या मार्गावर असून बळीराजाचे चेहरे कमालीचे हिरमुसले आहेत. मात्र,अशाही कठीण परिस्थितीत आभाळाकडे डोळे लावुन आणि हाताने काम करत शेतकऱ्यांनी पिकांना जीवदान देण्यासाठी शेतात दुंडणी आणि कुळपणीची कामे वेगाने सुरू ठेवली आहेत.
तालुक्यात सुरुवातीची साथ अन अचानक दडी
जून महिन्याच्या मध्यात तसेच जुलैच्या सुरुवातीस झालेल्या समाधानकारक पावसामुळे शेतकऱ्यांनी हजारो रुपये खर्च करून सोयाबीन, तूर आणि मूग यांसारख्या पिकांची पेरणी केली होती. अनेक भागांत अंकुरण उत्तम झाले, मात्र पिके वाढीच्या अवस्थेत असतानाच पावसाने दडी मारली. कडक ऊन आणि उष्ण वाऱ्यांमुळे जमिनीतील ओलावा संपत चालला असून, कोवळी पिके आता माना टाकू लागली आहेत.
पिकांना वाचवण्यासाठी 'दुंडणी-कुळपणी'चा आधार.....
पाऊस नसला तरी शेतकरी हातबल होऊन बसलेला नाही. पिकांच्या ओळींमधील गवत (तण) काढण्यासाठी आणि जमिनीतील राहिलेला अल्पसा ओलावा टिकवून ठेवण्यासाठी सध्या शेतात दुंडणी (कोळपणी) जोरात सुरू आहे.
दुंडणीचे महत्त्व....
कोळप्याच्या साहाय्याने जमिनीचा कडक झालेला थर फोडला जातो. यामुळे जमिनीला पडणाऱ्या भेगा बुजतात आणि पिकांच्या मुळाशी असलेला ओलावा हवेमुळे उडून जात नाही. एका अर्थाने, हा पाऊस येईपर्यंत पिकांना जिवंत ठेवण्याचा पारंपरिक आणि वैज्ञानिक प्रयत्न आहे.
शेतकऱ्यांची चिंता वाढली: दुबार पेरणीचे संकट?
जर पुढील ४ ते ५ दिवसांत दमदार पाऊस झाला नाही, तर शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे मोठे संकट ओढवण्याची शक्यता नाकारता येत नाही. आधीच खते, बियाणे आणि मशागतीसाठी हजारो रुपयांचे कर्ज काढलेला शेतकरी आता हवालदील झाला आहे.
तण नियंत्रण: पाऊस नसला तरी उन्हामुळे तण वेगाने वाढत असल्याने ते काढणे भाग आहे.
खतांचा खर्च वाया जाण्याची भीती: पाऊस नसल्याने बाजारातून आणलेली महागडी खते पिकांना देता येत नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत.
अस्मानी संकटाशी सामना सुरूच राहील
दरवर्षी निसर्ग आमची परीक्षा घेतो. यंदा सुरुवातीला चांगला पाऊस झाला म्हणून पदरचे पैसे लावून पेरणी केली. आता पिके कोमेजत आहेत. पण शेतकरी कधी धीर सोडत नाही, पाऊस येईल या आशेवर आम्ही कोळपणी करून जमीन भुसभुशीत ठेवत आहोत, जेणेकरून आलेल्या पावसाचा थेंब न् थेंब जमिनीत जिरेल.
बालाजी एस.माने (शेतकरी,हंडरगुळी)
आता संपूर्ण ग्रामीण भागाचे लक्ष हवामान खात्याच्या अंदाजाकडे आणि आकाशात येणाऱ्या काळ्या ढगांकडे लागले आहे. वरुणराजाने लवकरच कृपादृष्टी दाखवावी, एवढीच प्रार्थना सध्या चातकासारखी वाट पाहणारा बळीराजा करत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis