
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या विभागप्रमुखांची आढावा बैठक
बीड, 17 जुलै (हिं.स.) : जिल्हा परिषद, बीड आणि पंचायत समिती, बीड यांच्या विविध विभागप्रमुखांची आढावा बैठक घेऊन ग्रामीण भागातील विकासकामे, प्रलंबित प्रश्न आणि नागरिकांच्या दैनंदिन अडचणींचा सविस्तर आढावा आमदार क्षीरसागर यांनी घेतला.
बैठकीत ग्रामीण रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, कृषी, जलसंधारण तसेच विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला. संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करून प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना आमदार क्षीरसागर यांनी दिल्या.
शासनाच्या विविध योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत प्रभावीपणे पोहोचल्या पाहिजेत. नागरिकांना शासकीय कार्यालयांमध्ये विनाकारण हेलपाटे मारावे लागू नयेत, यासाठी प्रशासनाने अधिक जबाबदारीने, पारदर्शकपणे आणि संवेदनशीलतेने काम करावे, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकाच्या समस्या सोडविणे, विकासकामांना गती देणे आणि जनतेला गुणवत्तापूर्ण सुविधा उपलब्ध करून देणे हीच आपली प्राथमिकता असल्याचे आमदार क्षीरसागर यांनी सांगितले. बीड विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आपला पाठपुरावा आणि प्रयत्न यापुढेही अविरत सुरू राहतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis