
अमरावती, 17 जुलै (हिं.स.) | गंभीर गुन्ह्याच्या तपासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या जिल्ह्यातील आठ पोलिस निरीक्षक व सहायक पोलिस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांचा पोलिस अधीक्षक निकेतन कदम यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. ग्रामीण पोलिसांच्या मंथन हॉलमध्ये गुन्हेविषयक मासिक आढावा बैठकीनंतर या समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामीण भागात मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणणे, गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करणे, सात दिवसांत गुन्ह्याचा निपटारा करणे आदी कामगिरीबद्दल सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र एसपींनी प्रदान केले.
चांदूररेल्वेचे ठाणेदार सुरेश म्हस्के यांनी ते परतवाडा येथे असताना मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणले. आसेगावचे निरीक्षक सूरज तेलगोटे यांनी जून २०२६ मध्ये वॉरंट तामीली व इतर महत्त्वाची कामे केलीत. वरुडचे सहायक पोलिस निरीक्षक गोपीनाथ वाघमारे, पोलिस कर्मचारी अजय काळे, सागर शिवणकर यांनी सोने काढून देण्याच्या नावाने साडेबारा लाखांनी फसवणूक केलेल्या प्रकरणाचा तपास करून आरोपींना अटक केली व सव्वानऊ लाखांचा मालही जप्त केला. आसेगावचे सूरज तेलगोटे, पोलिस पंकज गावंडे, इजहार साकीब, विजय गायकवाड, सर्फराज शेख, रूपेश शिंगणे, विजय आसोलकर यांनीही महत्त्वाचे गुन्हे उघडकीस आणले. सोबतच तळेगाव दशासरचे निरीक्षक किरण औटे व कांचन दहाटे या दोघांचाही पोलिस अधीक्षक निकेतन कदम यांनी गौरव केला.
----------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी