
सोलापूर, 17 जुलै (हिं.स.)। सोलापूर महानगरपालिकेच्या विभागीय कार्यालयांमार्फत करण्यात आलेल्या नालेसफाईच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता व भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप करत भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक अनंत जाधव यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
जाधव यांनी म्हटले आहे की, नालेसफाईसाठी मोठ्या प्रमाणावर खर्च दाखविण्यात आला असला तरी अनेक ठिकाणी प्रत्यक्षात कामे अपूर्ण असून नागरिकांना त्याचा कोणताही लाभ झालेला नाही. पावसाळ्यात अनेक भागांमध्ये पाणी साचणे, तुंबलेले नाले आणि अस्वच्छतेची परिस्थिती पाहता करण्यात आलेल्या कामांच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.या प्रकरणात रणजित टूर्स अँड ट्रॅव्हल्स या संबंधित कंत्राटदाराच्या कामकाजाची तसेच देयके, कामाचे मोजमाप, यंत्रसामग्रीचा वापर आणि अधिकाऱ्यांच्या भूमिकेची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.महापालिकेने या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी अधिकारी व संबंधितांवर कठोर कारवाई करावी, तसेच नागरिकांच्या पैशांचा अपव्यय करणाऱ्यांना पाठीशी घालू नये, असेही जाधव यांनी स्पष्ट केले.या आरोपांमुळे सोलापूर महापालिकेच्या नालेसफाईच्या कामांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, प्रशासन या प्रकरणाची दखल घेऊन चौकशी करणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड