
- नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
- राष्ट्रपतींसह केंद्र सरकारला निवेदन
बीड, 17 जुलै (हिं.स.)।
शिक्षणतज्ज्ञ, संशोधक आणि पर्यावरणवादी नेते सोनम वांगचुक यांनी नीट परीक्षेतील कथित पेपरफुटी, शिक्षण क्षेत्रातील गोंधळ आणि पारदर्शक परीक्षा व्यवस्थेच्या मागण्यांसाठी दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू केलेल्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. आंदोलनादरम्यान केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
आंदोलनकर्त्यांनी सोनम वांगचुक जिंदाबाद, सोनम वांगचुक आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं, धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या, केंद्र सरकार मुर्दाबाद अशा घोषणा देत शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींविरोधात निषेध व्यक्त केला.
या आंदोलनानंतर जिल्हाधिकारी, बीड यांच्या मार्फत राष्ट्रपती, सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती, पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राज्यपाल जिष्णु देव वर्मा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठविण्यात आले.
प्रमुख मागण्या
नीट परीक्षेतील कथित पेपरफुटीची सखोल व निष्पक्ष चौकशी करावी.
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा.
स्पर्धा परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात.
देशभरात पारदर्शक, विश्वासार्ह आणि निष्पक्ष परीक्षा पद्धती लागू करावी.
विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित प्रश्नांवर तातडीने ठोस निर्णय घ्यावेत.
विविध संघटनांचा सहभाग
या आंदोलनात माहिती अधिकार कार्यकर्ते शेख युनुस, शेख मुबीन, शिवशर्मा शेलार, सामाजिक कार्यकर्ते रामनाथ खोड, बाळासाहेब मोरे पाटील (प्रदेशाध्यक्ष, शिवशक्ती भीमशक्ती विचारमंच), माजी सैनिक अशोक येडे (जिल्हाध्यक्ष, आम आदमी पार्टी, बीड), सय्यद सादेक (शहराध्यक्ष, आम आदमी पार्टी), रामधन जमाले (जिल्हाध्यक्ष, इंटक), राजेंद्र आमटे ( शेतकरी हक्क आंदोलक),हनुमान घोडके, भिमराव कुटे,प्राचार्य अँड.राजकुमार कदम ( सरचिटणीस मराठवाडा शिक्षक संघ),प्राचार्य डी. जी. तांदळे (मार्गदर्शक, मराठवाडा शिक्षक संघ), बाजीराव ढाकणे (लेक लाडकी अभियान), ज्येष्ठ समाजसेवक डॉ. संजय तांदळे, नितीन जायभाये (अध्यक्ष, बीड शहर बचाव मंच), नितीन सोनावणे (राज्य प्रवक्ता तथा बीड जिल्हाध्यक्ष, ऑल इंडिया पँथर सेना), सुखदेव नागरगोजे, सोनावणे एस एस,डी.एम.भोळे,शेख पाशाभाई, डी.बी.बोर्डे (कार्याध्यक्ष स्वाभिमानी विद्यूत वर्कर्स युनियन)यांच्यासह विविध सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील कार्यकर्ते सहभागी झाले.
आंदोलनाचे समन्वयक डॉ. गणेश ढवळे यांनी सांगितले की, सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा १९ वा दिवस असून त्यांचे ८.९ किलो वजन कमी झाले आहे. दिल्ली उच्च न्यायालयात दाखल जनहित याचिकेत म्हटले आहे उपोषण सुरूच राहिल्यास २ दिवसात वांगचुक यांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे त्यांच्या न्याय्य मागण्या तातडीने मान्य करून उपोषण सोडवावे आणि शिक्षण व्यवस्थेवरील विद्यार्थ्यांचा विश्वास पुनर्स्थापित करावा.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis