खरेदीच्या जोरावर शेअर बाजारात दमदार उसळी; सेन्सेक्स ९६4 अंकांनी तर निफ्टी २६1 अंकांनी वधारला
नवी दिल्ली, 17 जुलै (हिं.स.)। माहिती तंत्रज्ञान (आयटी) आणि बँकिंग क्षेत्रातील समभागांमध्ये झालेल्या जोरदार खरेदीमुळे तसेच निवडक समभागांमध्ये झालेल्या व्हॅल्यू बायिंगच्या आधारावर आज देशांतर्गत शेअर बाजारात मोठी तेजी पाहायला मिळाली. दिवसभर बाजारात सक
Stock Market Closing


नवी दिल्ली, 17 जुलै (हिं.स.)। माहिती तंत्रज्ञान (आयटी) आणि बँकिंग क्षेत्रातील समभागांमध्ये झालेल्या जोरदार खरेदीमुळे तसेच निवडक समभागांमध्ये झालेल्या व्हॅल्यू बायिंगच्या आधारावर आज देशांतर्गत शेअर बाजारात मोठी तेजी पाहायला मिळाली. दिवसभर बाजारात सकारात्मक वातावरण कायम राहिल्याने सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही प्रमुख निर्देशांकांनी भक्कम वाढ नोंदवत व्यवहाराची सांगता केली. सकाळी बाजाराची सुरुवातही वाढीसह झाली होती. सुरुवातीच्या काही मिनिटांत नफावसुलीमुळे किंचित घसरण झाली, मात्र त्यानंतर गुंतवणूकदारांनी आक्रमक खरेदी केल्याने बाजाराने वेगाने उंच भरारी घेतली.

बीएसईचा सेन्सेक्स १८३.९० अंकांच्या वाढीसह ७७,३७०.७७ अंकांवर उघडला. सुरुवातीला थोडा दबाव दिसून आला असला तरी त्यानंतर खरेदीचा जोर वाढत गेला. दुपारी सुमारे २.१५ वाजता सेन्सेक्सने इंट्रा-डेमध्ये तब्बल १,०९५.६८ अंकांची उसळी घेत ७८,२८२.५५ अंकांचा उच्चांक गाठला. शेवटच्या टप्प्यात काही प्रमाणात विक्री झाली, तरीही सेन्सेक्स ९६४.५८ अंकांच्या वाढीसह ७८,१५१.४५ अंकांवर बंद झाला.

एनएसईचा निफ्टीही ५४.८५ अंकांच्या वाढीसह २४,१२७.६० अंकांवर सुरू झाला. सुरुवातीच्या घसरणीनंतर खरेदीचा वेग वाढल्याने निफ्टीने दुपारनंतर २४,३६७.३० अंकांची इंट्रा-डे पातळी गाठली. अखेरीस निफ्टी २६१.५५ अंकांनी वधारत २४,३३४.३० अंकांवर स्थिरावला.

दिवसभर आयटी आणि बँकिंग क्षेत्रातील समभागांना मोठी मागणी राहिली. त्यामुळे निफ्टी आयटी निर्देशांक १.७५ टक्क्यांनी, तर बँक निर्देशांक १.६३ टक्क्यांनी वाढला. याशिवाय ऑटोमोबाईल, एफएमसीजी, ऑईल अँड गॅस आणि पब्लिक सेक्टर एंटरप्रायझेस क्षेत्रातील समभागांनीही चांगली कामगिरी केली. मात्र कॅपिटल गुड्स, हेल्थकेअर, मेटल आणि कन्झ्युमर ड्युरेबल्स क्षेत्रातील समभागांवर विक्रीचा दबाव कायम राहिला. ब्रॉडर मार्केटमध्येही मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक अनुक्रमे ०.४१ टक्के आणि ०.२१ टक्क्यांनी घसरले.

आजच्या तेजीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे ८२ हजार कोटी रुपयांची भर पडली. बीएसईमध्ये सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण मार्केट कॅपिटलायझेशन वाढून ४८०.९२ लाख कोटी रुपयांवर पोहोचले. मागील व्यवहाराच्या तुलनेत ही मोठी वाढ मानली जात आहे.

आज बीएसईमध्ये ४,४१२ समभागांमध्ये व्यवहार झाले. त्यापैकी १,७२२ समभाग वाढीसह, २,५०० समभाग घसरणीसह, तर १९० समभाग स्थिर राहिले. एनएसईमध्ये २,९९४ समभागांमध्ये व्यवहार झाले. त्यापैकी १,०८८ समभाग वाढले, तर १,९०६ समभाग घसरले. प्रमुख वाढणाऱ्या समभागांमध्ये टेक महिंद्रा, कोटक महिंद्रा, जिओ फायनान्शियल, टीसीएस आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांचा समावेश होता. तर हिंडाल्को इंडस्ट्रीज, डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज, विप्रो, सन फार्मास्युटिकल्स आणि मॅक्स हेल्थकेअर हे प्रमुख घसरणारे समभाग ठरले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande