अमरावतीत मोकाट जनावरांचा वाढता वावर; वाहतूक आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
अमरावती, १७ जुलै (हिं.स.) : अमरावती शहरातील प्रमुख रस्ते, चौक आणि बाजारपेठांमध्ये मोकाट जनावरांचा वाढता वावर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी गंभीर समस्या बनला आहे. दिवसासह रात्रीच्या वेळीही गायी व बैल रस्त्याच्या मध्यभागी बसलेले किंवा मुक्तपणे फिरत असल
मोकाट जनावरांमुळे वाहतुकीचा खोळंबा, अपघातांचा धोका


अमरावती, १७ जुलै (हिं.स.) : अमरावती शहरातील प्रमुख रस्ते, चौक आणि बाजारपेठांमध्ये मोकाट जनावरांचा वाढता वावर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी गंभीर समस्या बनला आहे. दिवसासह रात्रीच्या वेळीही गायी व बैल रस्त्याच्या मध्यभागी बसलेले किंवा मुक्तपणे फिरत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून अपघाताचा धोका वाढत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने तातडीने विशेष मोहीम राबवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

शहरातील मुख्य मार्गांवर रात्री पाच ते सहा गायी रस्त्याच्या मध्यभागी बसलेल्या असल्याचे चित्र वारंवार दिसून येत आहे. त्यामुळे वाहनचालकांना मोठी कसरत करून मार्ग काढावा लागत असून, अपुऱ्या प्रकाशात मोकाट जनावरे अचानक समोर आल्याने विशेषतः दुचाकीस्वारांसाठी अपघाताचा धोका अधिक वाढला आहे. पावसाळ्यात ओले रस्ते आणि कमी दृश्यमानतेमुळे ही समस्या अधिक गंभीर बनत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

स्थानिकांच्या मते, काही पशुपालक दूध काढल्यानंतर जनावरे दिवसभर आणि रात्री मोकाट सोडतात. ही जनावरे बाजारपेठ, बसस्थानक, शासकीय कार्यालय परिसर तसेच शाळा-महाविद्यालयांच्या मार्गांवर फिरत असल्याने विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

व्यापारी वर्गालाही या समस्येचा मोठा फटका बसत आहे. दुकानांसमोर ठेवलेला भाजीपाला, फळे आणि इतर खाद्यपदार्थ जनावरे खात असल्याच्या तक्रारी आहेत. काही ठिकाणी उभ्या वाहनांचे नुकसान झाल्याच्याही घटना समोर आल्या आहेत. तसेच कचराकुंड्यांमध्ये अन्न शोधताना प्लास्टिक खाल्ल्यामुळे मोकाट जनावरांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.

मोकाट जनावरांचा वाढता त्रास लक्षात घेता महापालिकेने विशेष पकड मोहीम राबवावी, गोशाळांमध्ये जनावरांची व्यवस्था करावी, पशुपालकांची नोंदणी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी नागरिक आणि व्यापारी वर्गाकडून होत आहे.

----------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande