विद्यार्थ्यांनो, मोबाईलमधील 'रील्स'पेक्षा पुस्तकांचे वाचन करा - उपविभागीय पोलीस अधिकारी
लातूर, 17 जुलै (हिं.स.)। आजच्या डिजिटल युगात विद्यार्थी मोबाईलच्या विळख्यात अडकत चालले आहेत. विशेषतः सोशल मीडियावरील इंस्टाग्राम रिल्स पाहण्याकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे, मात्र हे रिल्स पाहण्याऐवजी विद्यार्थ्यांनी अभ्यासातून उरलेल्या वेळेत वर
विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा


लातूर, 17 जुलै (हिं.स.)। आजच्या डिजिटल युगात विद्यार्थी मोबाईलच्या विळख्यात अडकत चालले आहेत. विशेषतः सोशल मीडियावरील इंस्टाग्राम रिल्स पाहण्याकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे, मात्र हे रिल्स पाहण्याऐवजी विद्यार्थ्यांनी अभ्यासातून उरलेल्या वेळेत वर्तमानपत्रे, महापुरुषांची आत्मचरित्रे आणि जनरल नॉलेजची पुस्तके वाचावीत, असा मोलाचा सल्ला अहमदपूर पोलीस स्टेशनचे उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद रायबोले यांनी दिला. अहमदपूर येथील परांडे कोचिंग क्लासेसच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव व मार्गदर्शन सोहळ्यात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद रायबोले यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. उपस्थितांना मार्गदर्शन करताना रायबोले पुढे म्हणाले की, स्पर्धा परीक्षेचा पाया हा लहानपणापासूनच भक्कम करावा लागतो. केवळ अभ्यासक्रमाची पुस्तके न वाचता अवांतर वाचन केल्यास विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडते आणि त्यांना भविष्यातील आव्हानांसाठी सज्ज होता येते.

यावेळी त्यांनी पालकांनाही एक महत्त्वाचा कानमंत्र दिला. अनेकदा पालक आपल्या पाल्यांना मोबाईलपासून दूर राहण्यास सांगतात, मात्र अनेकदा पालक स्वतःच मुलांसमोर मोबाईलचा वापर करताना दिसतात. असे न करता पालकांनी स्वतःही मुलांसमोर मोबाईल वापरणे टाळून त्यांना वाचनासाठी प्रोत्साहित करावे, जेणेकरून मुलांवर चांगले संस्कार होतील आणि त्यांचे लक्ष अभ्यासात एकाग्र राहील, असे आवाहन त्यांनी केले.

गुणगौरव सोहळ्याचा उत्साह

तत्पूर्वी, अहमदपूर शहरातील परांडे कोचिंग क्लासेसमधील सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात नवोदय आणि शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन अहमदपूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष स्वप्निल व्हत्ते यांच्या हस्ते झाले, तर अध्यक्षस्थानी प्रा. संतोष मुळे यांची उपस्थिती होती .

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालक परांडे जगन्नाथ यांनी केले. अहमदपूर पोलीस स्टेशनचे पीएसआय श्रीमंगल आनंद यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, स्पर्धा परीक्षा हाच यशाचा एकमेव आणि खात्रीशीर मार्ग असल्याचे नमूद केले. नगराध्यक्ष स्वप्निल व्हत्ते यांनीही शिक्षण ही केवळ शिक्षकांची नव्हे, तर पालक आणि समाजाची एकत्रित जबाबदारी असल्याचे प्रतिपादन केले.

यावेळी प्रा. चाकूरकर , मुसने बी.जी. , सौ. जोगदंड , प्रा. विनोद माने , वरिष्ठ पत्रकार गोविंद काळे, कैलास सूर्यवंशी, अजितभैया कदम आणि मनोज कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande