रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात चिमुकल्यावर दुर्मिळ ‘ब्रँकियल सिस्ट’ची यशस्वी शस्त्रक्रिया
रत्नागिरी, 17 जुलै (हिं.स.) । येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात वैद्यकीय क्षेत्रातील एक दुर्मिळ आणि यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली आहे. येथील कान-नाक-घसा (ईएनटी) विभागाच्या प्रमुख डॉ. सुनीता बागे यांनी अवघ्या पाच वर्षांच्या चिमुकल्यावर ‘ब्रँकियल सिस्ट’
ब्रँकियल सिस्ट शस्त्रक्रिया


रत्नागिरी, 17 जुलै (हिं.स.) । येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात वैद्यकीय क्षेत्रातील एक दुर्मिळ आणि यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली आहे. येथील कान-नाक-घसा (ईएनटी) विभागाच्या प्रमुख डॉ. सुनीता बागे यांनी अवघ्या पाच वर्षांच्या चिमुकल्यावर ‘ब्रँकियल सिस्ट’ या दुर्मिळ जन्मजात विकाराची यशस्वी शस्त्रक्रिया करून त्याला नवजीवन दिले आहे. रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात अशा प्रकारची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया प्रथमच झाली असून, ग्रामीण भागातील रुग्णांसाठी ही मोठी दिलासादायक बाब ठरली आहे.

‘ब्रँकियल सिस्ट’ हा एक जन्मजात विकार असून, गर्भावस्थेत मानेच्या भागातील ऊतींची वाढ पूर्ण न झाल्यामुळे तो निर्माण होतो. ही शस्त्रक्रिया अत्यंत आव्हानात्मक मानली जाते, कारण सिस्ट काढताना मानेतील महत्त्वाच्या रक्तवाहिन्या आणि मज्जातंतूना इजा होण्याचा मोठा धोका असतो. शस्त्रक्रियेदरम्यान हायपोग्लोसल, व्हॅगस किंवा फेशिअल मज्जातंतूंना इजा झाल्यास चेहरा किंवा मानेच्या स्नायूंच्या कार्यावर परिणाम होऊ शकतो. मात्र डॉ. सुनीता बागे यांनी अत्यंत सूक्ष्म नियोजन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून संपूर्ण सिस्ट सुरक्षितपणे काढून टाकली.

या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे बालकाच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली आहे. विशेष म्हणजे या संपूर्ण उपचार प्रक्रियेचा कोणताही आर्थिक भार संबंधित गरीब कुटुंबाला सहन करावा लागला नाही. शासकीय योजनांच्या माध्यमातून हे उपचार पूर्णपणे मोफत झाल्याने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी समाधान व्यक्त केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande