
नांदेड, 17 जुलै, (हिं.स.)। नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील मौजे बेंबर येथील रहिवासी असलेले शिक्षक सुनील नारायण मोरे यांनी आपल्या दोन चिमुकल्यांसह, सारा (१२) आणि सुमित (८) आपली जीवनयात्रा संपवल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. हिमायतनगर जवळील पोटा बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेल्या सुनील मोरेंनी १७ जुलै रोजी सकाळी ७:५० च्या सुमारास आपल्या विक्रांत गाडीसह मुगट पुलावरून गोदावरी नदीत उडी घेतली.ही घटना निव्वळ अपघाती नसून, प्रशासकीय छळाचा एक धक्कादायक प्रकार असल्याचे समोर येत आहे.
आत्महत्येपूर्वी त्यांनी आपल्या व्हॉट्सॲप स्टेटसवर आपली व्यथा मांडली होती. या स्टेटसमध्ये त्यांनी प्रचंड मानसिक त्रासाला कंटाळून हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे स्पष्टपणे नमूद केले होते.घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि SDRF च्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली आणि तीन तासांच्या अथक परिश्रमानंतर तिन्ही मृतदेह बाहेर काढले. एका शिक्षकाला आपल्या पोटच्या गोळ्यांसह मृत्यूला कवटाळावे लागते, ही बाब शिक्षण व्यवस्थेसाठी अत्यंत लाजीरवाणी आहे.
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis