अमरावती मनपाचा वर्धापन दिन दरवर्षी साजरा होणार
- सभागृह नेता चेतन गावंडे यांचा ठराव मंजूर अमरावती, 17 जुलै (हिं.स.) महानगरपालिकेचा वर्धापन दिन दरवर्षी अधिकृतरीत्या साजरा करण्यात यावा, हा सभागृह नेता तथा माजी महापौर चेतन गावंडे यांनी मांडलेला ठराव अमरावती महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत सर्वा
मनपाचा वर्धापन दिन दरवर्षी साजरा होणार


- सभागृह नेता चेतन गावंडे यांचा ठराव मंजूर

अमरावती, 17 जुलै (हिं.स.)

महानगरपालिकेचा वर्धापन दिन दरवर्षी अधिकृतरीत्या साजरा करण्यात यावा, हा सभागृह नेता तथा माजी महापौर चेतन गावंडे यांनी मांडलेला ठराव अमरावती महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला. ठराव मांडताना गावंडे यांनी अमरावती महानगरपालिका ही शहराच्या विकासाची प्रमुख संस्था असून, तिच्या स्थापनेपासून अनेक लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मोलाचे योगदान दिले आहे. या गौरवशाली प्रवासाचे स्मरण राहावे, नागरिकांमध्ये शहराबद्दल अभिमानाची भावना निर्माण व्हावी आणि महानगरपालिकेचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने वर्धापन दिन साजरा करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी त्यांनी वर्धापन दिनानिमित्त विविध विकासकामांचे लोकार्पण, स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, गुणवंत विद्यार्थी व उत्कृष्ट कर्मचारी सन्मान, माजी महापौर व माजी नगरसेवकांचा गौरव, तसेच शहराच्या इतिहासावर आधारित प्रदर्शने आणि जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्याची सूचना केली. या ठरावाला सभागृहातील सर्व सदस्यांनी उत्स्फूर्त पाठिंबा दिला. सकारात्मक चर्चेनंतर ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.

अमरावती महानगरपालिकेचा वर्धापन दिन हा केवळ उत्सव नसून शहराच्या विकासाचा इतिहास, लोकशाही मूल्ये आणि नागरिकांच्या सहभागाचा गौरव करणारा दिवस आहे. हा निर्णय शहराच्या अस्मितेला बळ देणारा असून, भविष्यात वर्धापन दिन लोकसहभागातून मोठ्या उत्साहात साजरा केला जाईल.

चेतन गावंडे, सभागृह नेता, मनपा.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande