
यवतमाळ , 17 जुलै, (हिं.स.) कळंब तालुक्यातील रुढा या गावातील शेतकरी चंद्रभान कुमरे यांच्या शेतात जाण्यासाठी तहसीलदार धीरज स्थूल हे आज स्वतः बैलबंडी हाकत शेतात पोहोचले व तेथील शेतक-यांच्या समस्या जाणून घेतल्या. तहसीलदार स्थूल हे शेतात पोहोचताच परिसरातील व गावातील शेतकर्!यांनी आनंद व्यक्त केला. तहसीलदार स्वतः बैलबंडी हाकू शकतात, याबद्दल सर्वांना कुतूहल वाटले.
यावेळी त्यांनी चंद्रभान कुमरे यांच्या शेताची व परिसरातील इतर शेतक-याच्या शेतात जाऊन पिकांची पाहणी केली तसेच पीक पाणी, पीक विमा, पांदण रस्ते, कर्ज, शेतमोजणी, एसआरआय नोंदणी तसेच शेतक-यांसाठी सरकारच्या असलेल्या विविध योजनांची माहिती दिली व त्याबाबत चर्चा केली. सध्या पिके उत्तम आहेत. परंतु पावसाअभावी पीके सुकत असल्याबाबत शेतक-यांनी चिंता व्यक्त केली असता ज्यांच्याकडे विहीरीचे, नदीचे किंवा इतर मार्गाने पिकांना पाणी देता येत असेल, त्यांनी स्प्रिंकलद्वारे पिकांना पाणी द्यावे व पीके जगवावीत, असे सांगितले.
--------------------------------------------------------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी