अंबाजोगाई पालखी सोहळ्यातील चोरीचा पर्दाफाश; तीन आरोपी जेरबंद
बीड, 17 जुलै, (हिं.स.)। : गजानन महाराज पालखी सोहळ्यादरम्यान भाविकांच्या गर्दीचा फायदा घेत साखळी चोरी करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) बीडने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत सुमारे ५९ ग्रॅम वजनाचे जवळपास ६ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने हस्तग
पोलीस कारवाई


बीड, 17 जुलै, (हिं.स.)। : गजानन महाराज पालखी सोहळ्यादरम्यान भाविकांच्या गर्दीचा फायदा घेत साखळी चोरी करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) बीडने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत सुमारे ५९ ग्रॅम वजनाचे जवळपास ६ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले असून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

पालखी सोहळ्यात दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी असताना दोन वेगवेगळ्या चोरीच्या घटना घडल्या होत्या. याप्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं. 290/2026 व गु.र.नं. 293/2026 असे भारतीय न्याय संहिता कलम 303(2) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते.

स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपास करून दोन्ही गुन्ह्यांचा छडा लावला. विशाल संजय हाताळे (वय 28), दत्ता विजय गायकवाड (वय 26) आणि अशोक बबन जाधव (वय 29), सर्व रा. बीड यांना अटक करण्यात आली. आरोपींकडून ४८ ग्रॅमची सोन्याची चेन आणि ११ ग्रॅमचे सोन्याचे मिनी गंठण असा एकूण ५९ ग्रॅम वजनाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषीकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी वेंटेवाड व त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande