
लातूर, 17 जुलै, (हिं.स.)। राज्य शासनाने संगणक परिचालकांना 'कर्मचारी' मानण्यास वारंवार नकार दिलेला असताना, आता निवडणूक आयोगाच्या विशेष पुनर्रिक्षण (SIR) मोहिमेसाठी त्यांना बळजबरीने कामे करण्यास भाग पाडले जात आहे. या अन्यायी भूमिकेच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेने अधिकृतपणे 'कामावर बहिष्कार' टाकण्याचा निर्णय घेतला असून, जोपर्यंत शासन कर्मचारी दर्जा आणि किमान वेतन देत नाही, तोपर्यंत निवडणूक विभागाची कोणतीही कामे करणार नसल्याचा इशारा दिला आहे.
या गंभीर विषयावर अधिकृत भूमिका मांडण्यासाठी महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना, लातूर जिल्हा यांच्या वतीने संघटनेच्या शिष्टमंडळाने उपमुख्य कार्यकारी अधिकारी वाघ यांची विशेष भेट घेतली. या भेटीदरम्यान, संघटनेने SIR (Special Intensive Revision) कामाबाबत सविस्तर निवेदन सादर करून आपली भूमिका स्पष्ट केली. निवेदनात नमूद केले आहे की, ग्रामपंचायत संगणक परिचालक हे कोणत्याही शासकीय विभागाचे कर्मचारी नसून स्वतंत्र उद्योजक आहेत. त्यामुळे त्यांची SIR कामासाठी अथवा बीएलओ (BLO) सहाय्यक म्हणून निवड करणे तांत्रिकदृष्ट्या बेकायदेशीर आहे. कोणत्याही विभागाची अतिरिक्त जबाबदारी देण्यापूर्वी त्यांच्या सेवा व दर्जाबाबत शासनाने स्पष्ट धोरण जाहीर करावे, अशी मागणी संघटनेने केली आहे.
गेल्या १४ वर्षांपासून राज्यातील ग्रामपंचायतींमध्ये 'संग्राम' व 'आपले सरकार सेवा केंद्र' प्रकल्पांतर्गत कार्यरत असलेल्या परिचालकांबाबत ग्रामविकास विभागाने दिनांक ३ ऑक्टोबर २०१७, २८ फेब्रुवारी २०१९ आणि २ डिसेंबर २०२२ रोजी निर्गमित केलेल्या पत्रांतून हे स्पष्ट केले आहे की, संगणक परिचालक हे राज्य शासन, जिल्हा परिषद, पंचायत समिती किंवा ग्रामपंचायतीचे कायमस्वरूपी किंवा कंत्राटी कर्मचारी नाहीत. या शासकीय निर्देशांची आठवण करून देत, संघटनेने आता बळजबरीने कामे लादल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
यावेळी निवेदन सादर करताना महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना, लातूरचे राज्य तांत्रिक प्रमुख तथा जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर सूर्यवंशी, जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण मलिले, जिल्हा सचिव पवन साठे, जळकोट तालुका अध्यक्ष रामेश्वर सोनटके, रेणापूर तालुका अध्यक्ष सुशांत जाधव, शिरूर अनंतपाळ तालुका अध्यक्ष गोविंद सुरवसे, लातूर तालुका सचिव पीरपाशा शेख, औसा तालुका सचिव सचिन भोसले आणि जिल्हा संघटक संतोष गडकरी आदी पदाधिकारी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis