
रत्नागिरी, 17 जुलै (हिं.स.) । जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सीलबंद करून बँक ऑफ महाराष्ट्रच्या कायदेशीर ताब्यात देण्यात आलेल्या सदनिकेत बेकायदेशीर प्रवेश केल्याप्रकरणी कुवारबाव येथील पती-पत्नीविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आसिया अब्दुल रशीद मुक्री (वय ४०) आणि अब्दुल रशीद मुक्री (वय ४८, दोघेही रा. गुलाब वाटिका अपार्टमेंट, कुवारबाव) अशी संशयितांची नावे आहेत. या प्रकरणी लोहित जी. डी. (मूळ रा. चिकमंगलूर, कर्नाटक; सध्या रा. कुवारबाव, रत्नागिरी) यांनी १३ जुलै रोजी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
तक्रारीनुसार, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांच्या आदेशानुसार संबंधित सदनिकेचा कायदेशीर ताबा मंडळ अधिकाऱ्यांनी बँक ऑफ महाराष्ट्रच्या पाली शाखेकडे सुपूर्द केला होता. त्यानंतर सदनिकेला लाखेचे अधिकृत सील असलेले कुलूप लावण्यात आले होते. मात्र ३१ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ४ वाजता संशयित दाम्पत्याने कोणतीही पूर्वपरवानगी न घेता सीलबंद कुलूप तोडून सदनिकेत प्रवेश केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गृहातिक्रमणासह संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी