डोंबिवली हल्ल्याच्या निषेधार्थ लातूरचे डॉक्टर 20 जुलैच्या 24 तासांच्या बंदमध्ये सहभागी
लातूर, 18 जुलै (हिं.स.) : डोंबिवली येथील शास्त्रीनगर महापालिका रुग्णालयात डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ लातूर जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्र एकवटले आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) महाराष्ट्रच्या आवाहनाल
आरोग्यसेवा राहणार बंद


लातूर, 18 जुलै (हिं.स.) : डोंबिवली येथील शास्त्रीनगर महापालिका रुग्णालयात डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ लातूर जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्र एकवटले आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) महाराष्ट्रच्या आवाहनाला प्रतिसाद देत आयएमए लातूर शाखेतर्फे 20 जुलै रोजी सकाळी 6 वाजल्यापासून 21 जुलै रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत 24 तासांचे आरोग्य सेवा बंद आंदोलन करण्यात येणार आहे.

या आंदोलनात ऍलोपॅथीसह सर्व वैद्यकीय शाखांतील डॉक्टर, परिचारिका, पॅरामेडिकल कर्मचारी आणि आरोग्य क्षेत्रातील विविध घटक सहभागी होणार आहेत. बंददरम्यान ओपीडी, नियोजित शस्त्रक्रिया आणि नियमित वैद्यकीय सेवा बंद राहतील, मात्र आपत्कालीन सेवा आणि अतिदक्षता विभागातील उपचार सुरळीत सुरू राहणार असल्याचे आयएमएने स्पष्ट केले आहे.

आयएमए लातूरचे अध्यक्ष डॉ. हर्षवर्धन राऊत यांनी सांगितले की, डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवरील वाढत्या हिंसाचारामुळे वैद्यकीय क्षेत्रात असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र केंद्रीय कायदा, हिंसाचाराविरोधात ‘झिरो टॉलरन्स’ धोरणाची अंमलबजावणी आणि सर्व रुग्णालयांमध्ये अत्याधुनिक सुरक्षा व्यवस्था तातडीने लागू करण्याची मागणी करण्यात आली आहे.

आयएमएचे सचिव डॉ. विश्रांत भारती यांनी हल्लेखोरांवर कोणताही राजकीय हस्तक्षेप न करता कठोर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच डॉक्टरांवरील गंभीर हल्ले अजामीनपात्र गुन्हे घोषित करावेत आणि अशा प्रकरणांचा जलदगती न्यायालयामार्फत निश्चित कालमर्यादेत निकाल लावावा, अशी मागणी त्यांनी केली.

दरम्यान, आयएमएने नागरिकांना आवाहन केले आहे की, 20 जुलै रोजी अत्यावश्यक नसलेल्या उपचारांसाठी रुग्णालयात येणे टाळावे आणि आंदोलनाला सहकार्य करावे. शासनाने मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास 1 ऑगस्टपासून राज्यभर बेमुदत आंदोलन छेडण्याचा इशाराही आयएमएने दिला आहे.

------------------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande