परभणी - व्यापाऱ्याने घातला शेतक-यांना साडेपाच कोटींचा गंडा
परभणी, 18 जुलै, (हिं.स.)। पूर्णा तालुक्यातील एरंडेश्वर येथे शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करून तब्बल १०० ते १५० शेतकऱ्यांचा सुमारे ६ हजार ८०० क्विंटल शेतमाल लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हळद, सोयाबीन, हरभरा, गहू व तूर असा शेतमाल खरेदी
परभणी - व्यापाऱ्याने घातला शेतक-यांना साडेपाच कोटींचा गंडा


परभणी, 18 जुलै, (हिं.स.)। पूर्णा तालुक्यातील एरंडेश्वर येथे शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करून तब्बल १०० ते १५० शेतकऱ्यांचा सुमारे ६ हजार ८०० क्विंटल शेतमाल लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हळद, सोयाबीन, हरभरा, गहू व तूर असा शेतमाल खरेदी करून त्याचे सुमारे साडेपाच कोटी रुपयांचे देणे थकवून व्यापारी आपल्या मुलांसह फरार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी पूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

एरंडेश्वर हे शेतीप्रधान गाव म्हणून ओळखले जाते. या गावात मागील काही वर्षांपासून वास्तव्यास असलेले शेख हमीद शेख बालेसाब व शेख सरू शेख बालेसाब हे पितापुत्र सुरुवातीला परिसरातील शेतकऱ्यांकडून नियमितपणे भुसार माल खरेदी करत होते. सुरुवातीच्या व्यवहारांमध्ये वेळेवर पैसे देऊन त्यांनी शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला. त्यामुळे परिसरातील अनेक शेतकरी त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर शेतमाल विकू लागले.मात्र, मागील काही महिन्यांपासून या व्यापाऱ्यांनी एरंडेश्वरसह परिसरातील शेतकऱ्यांकडून १ हजार ९६ क्विंटल हळद, ३ हजार ६३० क्विंटल सोयाबीन, २ हजार क्विंटल हरभरा, ५७ क्विंटल गहू आणि ३५ क्विंटल तूर असा एकूण सुमारे ६ हजार ८०० क्विंटल शेतमाल खरेदी केला. मालाची उचल केल्यानंतर सध्या बाजारात तेजी-मंदी आहे, काही दिवसांत पैसे देतो, असे सांगत त्यांनी शेतकऱ्यांना वारंवार आश्वासने दिली. मात्र, पैसे देण्यास सातत्याने टाळाटाळ करण्यात आली. यानंतर व्यापाऱ्याने आपल्या मुलासह गावातुन पोबारा केल्याने शेतकऱ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. आपली मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याचे लक्षात येताच संतप्त शेतकऱ्यांनी थेट पूर्णा पोलीस ठाणे गाठून सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी सिंगणवाड यांच्याकडे सामूहिक तक्रार दाखल केली.

प्राथमिक माहितीनुसार या प्रकरणात शेकडो शेतकऱ्यांची फसवणूक झाली असून, लंपास करण्यात आलेल्या शेतमालाची बाजारभावानुसार किंमत सुमारे साडेपाच कोटी रुपये असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी सामूहिक तक्रारीची दखल घेत संबंधित व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पूर्णा पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेमुळे एरंडेश्वरसह संपूर्ण परिसरातील शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून, संबंधित व्यापाऱ्याला तातडीने अटक करून शेतकऱ्यांची रक्कम वसूल करण्याची मागणी होत आहे. अनेक शेतकऱ्यांचे वर्षभराचे आर्थिक गणित या फसवणुकीमुळे कोलमडले असून, या प्रकरणाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande