
अमरावती, 18 जुलै (हिं.स.) : भूमी अभिलेख विषयक कामकाज अधिक गतिमान करण्यासाठी आणि नागरिकांना किरकोळ कामांसाठी अमरावती येथे येण्याची गरज भासू नये, या उद्देशाने अचलपूर येथे जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख-२ कार्यालयाची स्थापना करण्यात आली आहे. या कार्यालयातून आता सहा तालुक्यांचे कामकाज स्वतंत्रपणे सुरू झाले असून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रशासकीय कामकाजावरील ताण कमी करून विकेंद्रीकरणाला प्राधान्य दिले आहे. त्यानुसार अचलपूर येथे नव्या कार्यालयाची निर्मिती करण्यात आली असून, सध्या या कार्यालयाचा अतिरिक्त प्रभार जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख महेशकुमार शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
अचलपूर येथील प्रशासकीय भवनात सुरू करण्यात आलेल्या या कार्यालयासाठी चार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कार्यालयामार्फत अचलपूर, चांदूरबाजार, दर्यापूर, अंजनगाव सुर्जी, धारणी आणि चिखलदरा या सहा तालुक्यांतील भूमी अभिलेख विषयक कामकाज स्वतंत्रपणे हाताळले जाणार आहे. विशेषतः मेळघाटातील धारणी व चिखलदरा तालुक्यांतील नागरिकांना याचा मोठा लाभ होणार असून, त्यांचा वेळ आणि प्रवासाचा खर्चही वाचणार आहे.
दरम्यान, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय, अमरावती क्रमांक-१ च्या कार्यक्षेत्रात अमरावती, भातकुली, नांदगाव खंडेश्वर, चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे, तिवसा, मोर्शी आणि वरुड या आठ तालुक्यांचा समावेश राहणार आहे.
--------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी