
लातूर, 18 जुलै, (हिं.स.)। लातूर जिल्ह्यात शाळा, महाविद्यालये आणि विविध शिकवणी वर्ग सुरू झाल्यानंतर विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी लातूर पोलिसांनी विशेष प्रतिबंधात्मक मोहीम हाती घेतली आहे. शैक्षणिक संस्थांच्या परिसरात विनाकारण रेंगाळणे, विद्यार्थिनींचा पाठलाग करणे, छेडछाड करणे किंवा मानसिक त्रास देणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी दामिनी पथकाला दिले आहेत.
या आदेशानुसार दामिनी पथकाकडून दररोज सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत शाळा, महाविद्यालये, शिकवणी वर्ग तसेच संवेदनशील परिसरात नियमित गस्त घालण्यात येत आहे. अचानक तपासणी, संशयितांवर लक्ष ठेवणे तसेच विद्यार्थिनींशी संवाद साधून त्यांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण करण्याचे कामही पथकाकडून सातत्याने केले जात आहे. या विशेष मोहिमेदरम्यान शैक्षणिक संस्थांच्या परिसरात संशयास्पद हालचाली करणाऱ्या आणि विनाकारण रेंगाळणाऱ्या ८५ जणांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम ११० व ११७ अन्वये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. भविष्यातही अशा प्रकारच्या गैरवर्तनाविरुद्ध तातडीने कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
लातूर पोलिसांनी विद्यार्थिनी, पालक आणि शैक्षणिक संस्थांना आवाहन केले आहे की, शाळा, महाविद्यालय किंवा शिकवणी वर्गाच्या परिसरात कोणाकडूनही त्रास होत असल्यास, पाठलाग केला जात असल्यास किंवा संशयास्पद हालचाली दिसल्यास त्या घटना लपवून न ठेवता त्वरित ११२ या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच परिसरात गस्त घालणाऱ्या दामिनी पथकाला किंवा जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी. महिलांच्या आणि विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. सुरक्षित शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यासाठी अशा विशेष मोहिमा नियमितपणे सुरू राहतील, असा संदेश लातूर पोलिसांनी दिला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis